मुंबई: काही दिवसांपूर्वी चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात शाब्दिक द्वंद्व रंगले होते. यावेळी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांनी एकमेकांवर सडकून टीका केली होती. उद्घाटनावेळी उद्धव ठाकरे नारायण राणे यांच्या कानात काहीतरी बोलले होते. तेव्हा या गोष्टीचा खुलासा होऊ शकला नव्हता. मात्र, नारायण राणे यांनी शुक्रवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत याबाबतचा गौप्यस्फोट केला.
चिपी विमानतळाच्या कार्यक्रमाच्या आदल्यादिवशी नारायण राणे यांनी आपण भांडाफोड करणार, असा इशारा दिला होता. हाच धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी उद्घाटनावेळी नारायण राणे यांच्या कानापाशी जाऊन खोचक टिप्पणी केली होती. तुम्ही भांडी आणलीत का, असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. हे ऐकल्यानंतर मी आज भांडाफोड करायचीच, असे ठरवले. त्यानंतर मी व्यासपीठावर जाऊन बोललो. माझ्या टीकेनंतर उद्धव ठाकरे अगदी स्टेजवरुन खाली उतरेपर्यंत माझ्याशी एक शब्दही बोलले नाहीत. आमच्या दोघांच्या आसनांमधील अंतरही वाढवण्यात आले, असे नारायण राणे यांनी सांगितले. नारायण राणे यांच्या या टीकेला आता शिवसेनेकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातली टशन चिपी विमानतळावरही दिसली होते. विमानतळाच्या कोनशिलेच्या अनावरप्रसंगी उद्धव ठाकरे, नारायण राणे, अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि इतरही मंत्री उपस्थित होते. यावेळी नारायण राणे आणि अजित पवार यांनी एकाच वेळी एकमेकांना नमस्कार घातला. बाळासाहेब थोरात आणि राणेंनीही एकमेकांना नमस्कार घातला. पण ना उद्धव ठाकरेंनी राणेंकडे बघितलं ना राणेंनी उद्धव ठाकरेंकडे पाहिलं. एकंदरितच तेरे भी चुप-मेरे भी चुप असा प्रसंग उपस्थितांनी अनुभवला.
नारायण राणे यांनी शुक्रवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत शरद पवार यांचे कौतुक करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. यावेळी राणेंनी शरद पवार आणि काँग्रेसच्या विरोधात शिवसेनेने दिलेल्या हेडिंगच वाचून दाखवल्या. काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे अधू मेंदूचे लोक आहेत. प्रत्येक ठिकाणी सिंचनाचे प्रकल्प तुमच्या दिवट्याने कसे अर्धवट टाकले हे पाहा, अशा हेडिंग सामनाने दिल्या होत्या. आज मात्र ते पवार आणि काँग्रेसचे गुणगाण गात आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.
संबंधित बातम्या:
तुमचा ‘तो’ खासदार काही काळाने भाजपमध्ये येईल, तेव्हा बोंबलू नका; नारायण राणेंचा राऊतांना इशारा
दुसऱ्यांच्या मुलाचं बारसं करण्याची शिवसेनेला सवयच; नारायण राणेंची फटकेबाजी
रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने संजय राऊतांना भान राहत नाही, नारायण राणेंचा हल्लाबोल