Congress: एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर काँग्रेस अलर्ट मोडवर, सर्व आमदारांना मुंबई गाठण्याचे आदेश, पोहोचेपर्यंत लोकेशन ट्रेस होणार
Congress: एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर काँग्रेस नेते सावध झाले आहेत. राज्य सरकार कोसळण्याची चिन्हे असल्याने काँग्रेसने आपल्या आमदारांना मुंबईत तातडीने बोलावून घेतलं आहे. शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत, याची आकडेवारी आघाडीकडे नाही.
मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेविरोधात (Shivsena) बंड पुकारलं आहे. तब्बल 35 आमदारांना सोबत घेऊन त्यांनी सुरतच्या हॉटेलात तळ ठोकला आहे. शिंदे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना प्रस्ताव ठेवले. पण उद्धव ठाकरे यांनी हे प्रस्ताव फेटाळतानाच शिंदे यांची पक्षाच्या गटनेतेपदावरून हकालपट्टी केली. त्यामुळे शिंदे यांच्या परतीचे सर्व मार्ग बंद झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भाजपने आपल्या आमदारांना गोवा किंवा इतर राज्यात रवाना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसही अलर्ट मोडवर आली आहे. काँग्रेसनेही त्यांच्या सर्व आमदारांना तात्काळ मुंबई गाठण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हे आमदार मुंबईलाच येत आहेत ना याची खात्री करण्यासाठी त्यांचं लोकेशनही काँग्रेसकडून ट्रेस केलं जाणार आहे. कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर काँग्रेस नेते सावध झाले आहेत. राज्य सरकार कोसळण्याची चिन्हे असल्याने काँग्रेसने आपल्या आमदारांना मुंबईत तातडीने बोलावून घेतलं आहे. शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत, याची आकडेवारी आघाडीकडे नाही. त्यामुळे भाजपने सत्ता स्थापण्याची तयारी केल्यास आमदारांचा आकडा कमी पडल्यावर आपले उमेदवार फोडल्या जाऊ नयेत म्हणून काँग्रेसने खबरदारी घेतली आहे.
लोकेशन ट्रेस करणार
या आमदारांना मुंबईला येण्याचे निरोप देतानाच त्यांचे लोकेशन ट्रेस करण्याचा निर्णयही काँग्रेसने घेतला आहे. मुंबईला येण्याच्या नावाखाली भाजपच्या कळपात कोणत्याही आमदाराने जाऊ नये यासाठी या आमदारांचं लोकेशन ट्रेस केलं जाणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांची पंचाईत झाली आहे.
हॉटेलात ठेवणार
काँग्रेस या आमदारांना मुंबईतील हॉटेलात ठेवणार आहे. मात्र, आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास किंवा फोडाफोडीचं राजकारण सुरू झाल्यास काँग्रेसच्या या नेत्यांना राज्याबाहेरही ठेवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधान परिषदेवरही मंथन
दरम्यान, काँग्रेसने आमदारांची आज संध्याकाळी मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थिती, शिंदे यांचं बंड आणि विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा झालेला पराभव यावर चर्चा होणार आहे.
भाजपचे आमदार गोव्याला जाणार
दरम्यान, भाजपच्या आमदारांना गोव्यात ठेवलं जाणार आहे. राज्यात फोडाफोडीचं राजकारण होऊ शकतं. त्यामुळे आघाडीच्या गळाला आपले आमदार लागू नये म्हणून भाजपच्या आमदारांना गोव्यात ठेवलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.