Congress : काँग्रेसवर ‘या’ मतदारसंघात उमेदवार बदलण्याची नामुष्की का?
काँग्रेसने आधी उमेदवाराच नाव जाहीर केलं. पण आता काँग्रेसवर उमेदवार बदलाची नामुष्की ओढवू शकते. काँग्रेसला जाहीर केलेला उमेदवार बदलून दुसऱ्या उमेदवाराची घोषणा करावी लागू शकते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटचे दोन दिवस उरले आहेत.
![Congress : काँग्रेसवर 'या' मतदारसंघात उमेदवार बदलण्याची नामुष्की का? Congress : काँग्रेसवर 'या' मतदारसंघात उमेदवार बदलण्याची नामुष्की का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/10/Congress-Party.jpg?w=1280)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले आहेत. मात्र, अजूनही महाविकास आघाडीमधील उमेदवारीचा घोळ संपलेला नाही. आता पश्चिम महाराष्ट्रातील एका मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरु आहेत. महाविकास आघाडीमध्ये आधी कोण किती? आणि कुठल्या मतदारसंघातून लढणार या बद्दल रस्सीखेच होती. काँग्रेस आणि ठाकरे गटामधील मतभेद स्पष्टपणे दिसून आले. आता एका मतदारसंघात उमेदवार जाहीर केल्यानंतर तो बदलण्याच्या हालचाली काँग्रेसकडून सुरु झाल्या आहेत.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात काँग्रेसकडून उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसने कोल्हापूर उत्तर मधून राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. राजेश लाटकर यांचं नाव जाहीर होतास काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली. काँग्रेसमधील निष्ठावंत कार्यकर्ते माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली.
कोणाला उमेदवारी देणार?
जाहीर केलेल्या उमेदवारासंदर्भात मोठी नाराजी असल्याने काँग्रेसकडून तातडीने उमेदवार बदलाच्या हालचाली सुरू आहेत. राजेश लाटकर यांचं नाव बदलून त्या ठिकाणी मधुरिमाराजे छत्रपती यांचं नाव येण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात यावेळी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षासाठी वातावरण अनुकूल आहे.