मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस उरले आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान तर 15 दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपापले स्टार प्रचारक जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने महाराष्ट्रातील पहिल्या दोन टप्प्यातील निवडणुकांसाठी 40 स्टार प्रचारकांची यादी काँग्रेसने प्रसिद्ध केली आहे. या यादीत सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, नगमा, कुमार केतकर, मोहम्मद अझहरुद्दीन, इम्रान प्रतापगडी यांच्यासह राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील दिग्गजांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, काँग्रेसच्या पत्रकार परिषदा, सभा, मेळाव्यांपासून काही अंतरावर राहण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचेही नाव स्टार प्रचारकांमध्ये आहे. मात्र, नगरमध्ये आपण प्रचाराला जाणार नाही, असे याआधीच विखेंनी जाहीर केले आहे. सुपुत्र सुजय विखे पाटील यांना तिकीट न मिळाल्याने आणि सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिक्रियांमुळे राधाकृष्ण विखे पाटील दुखावले आहेत. विखे पाटलांनी तसे जाहीरपणे बोलूनही दाखवले आहे.
काँग्रेसच्या महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांमध्ये अभिनेत्री नगमा, माजी क्रिकेटर मोहम्मद अझहरुद्दीन, प्रसिद्ध शायर इम्रान प्रतापगडी यांचीही नावं आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध समूहांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी तयार केल्याचे दिसते आहे.
काँग्रेसचे नेते मोतीलाल व्होरा यांनी काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली असून, हीच यादी निवडणूक आयोगालाही सुपूर्द केली जाईल.
काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची संपूर्ण यादी :
निवडणुकीच्या तारखा जाहीर
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.
महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.