विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी बाळासाहेब थोरात आघाडीवर
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर, विधानसभेतील महत्त्वाच्या पदांबाबत महाराष्ट्र काँग्रेसने फेररचना केली आहे. विधिमंडळ नेतेपदी राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे, तर विधानसभा नेतेपदी विदर्भातील काँग्रेसचे मोठे नेते विजय वडेट्टीवर यांची वर्णी लागली आहे. विजय वडेट्टीवार हेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते असतील, हेही आता जवळपास निश्चित झालं आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे नाराज आहेत. मुलगा खासदार सुजय विखे पाटील यांना नगर दक्षिणमधून लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने विखे पाटील नाराज झाले होते. त्यानंतर ते काँग्रेसपासून अंतर राखू लागले आणि आता तर त्यांच्या भाजपप्रवेशाची केवळ औपचारिकताच बाकी आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमध्ये असून नसल्यासारखे आहेत. त्यात त्यांनी विधानसभा विरोधीपक्षनेतेपदाचाही राजीनामा दिला आहे.
काही दिवसांवर पावसाळी अधिवेशन येऊन ठेपलं आहे. विखे पाटलांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याने, हे पद रिक्त होते. त्यामुळे काँग्रेसने आज विधिमंडळातील पदांची फेररचना केली. विधिमंडळ नेतेपदापासून प्रतोद पदापर्यंत सर्व ठिकाणी नवीन नेत्यांची निवड केली.
विशेष म्हणजे, विधिमंडळ नेतेपदी बाळासाहेब थोरात यांना संधी देण्यात आली आहे. बाळासाहेब थोरात हे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. म्हणजे, राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. शिवाय, थोरात हे गांधी कुटुंबीयांचे निष्ठावंत आणि निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे थोरातांना संधी दिल्याने काँग्रेसची आगामी वाटचाल कुणाच्या नेतृत्त्वात असेल, हेही जवळपास स्पष्ट करण्यात आले आहे.
दुसरीकडे, विधानसभा नेतेपदी काँग्रसेचे विदर्भातील ब्रम्हापूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांना संधी दिली आहे. आता विधानसभेचा विरोधी पक्षनेता सभागृह सुरु झाल्यानंतरच ठरेल. मात्र, विजय वडेट्टीवर हेच विरोधी पक्षनेते असतील, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या उरलेल्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने मुख्यमंत्रीही विदर्भातील असतील आणि विजय वडेट्टीवार यांच्या रुपाने विरोधी पक्षनेताही विदर्भातील असेल.
काँग्रेसच्या नवीन नियुक्त्या :
- बाळासाहेब थोरात – विधिमंडळ नेते (दोन्ही सभागृह)
- विजय वडेट्टीवार – विधानसभा नेते
- मोहम्मद आरिफ नसीम खान – विधानसभा उपनेते
- बसवराज पाटील – मुख्य प्रतोद (विधानसभा)
- के. सी. पडवी – प्रतोद (विधानसभा)
- सुनील केदार – प्रतोद (विधानसभा)
- जयकुमार गोरे – प्रतोद (विधानसभा)
- प्रणिती शिंदे – प्रतोद (विधानसभा)
- शरद रणपिसे – विधानपरिषद नेते
- रामहरी रुपनवार – विधानपरिषद उपनेते
- भाई जगताप – प्रतोद (विधानपरिषद)