राज्यात येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे, काँग्रेसही येत्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत जोमाने उतरणार आहे. त्यासाठी काँग्रेसने आत्तापासूनच जोरदार तायरी सुरू केली आहे, काँग्रेसने स्थानिक पातळीवर उमेदवारांची चाचपणी आत्तापासूनच सुरू केली आहे. त्यासाठी काँग्रेसकडून हलचाली वाढल्या आहेत, नाना पटोलेंसारखा आक्रमक प्रदेशाध्यक्ष काँग्रेसला बऱ्याच वर्षांनी मिळाला आहे, नाना पटोलेंनी राज्याची सुत्रं हाती घेतल्यापासूनच 2024 पर्यंत काँग्रेसला राज्यातला नंबर एकचा पक्ष बनवण्याचा विडा उचलला आहे. तीच पटोलेंची आक्रमकता आत्ताही दिसू लागली आहे.
काँग्रेसच्या स्वबळावर लढण्यासाठी हलचाली
राज्यात सरकार चालवताना जरी तिन्ही पक्ष एकत्र असले तरी स्थानिक पातळीवरील वाद कधी लपले नाहीत, त्यामुळेच काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. त्या अनुषंगाने राज्यातल्या नेतृत्वाने हलचालीही सुरू केल्या आहेत, महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची नावं प्रदेश कार्यालयाला देण्याच्या पक्षाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात राज्यातील जिल्हा काँग्रेस कमिटीला काँग्रेस पक्षाकडून पत्रं पाठवण्यात आली आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून ही स्वबळाची तयारी सुरू असल्याच्या चर्चा आहेत.
स्थानिक पातळीवरील राजकीय गणितं वेगळी
राज्यात सत्तेत कोणतेही पक्ष एकत्र असले तरी नेहमी स्थानिक पातळीवरील राजकीय गणितं वेगळी असता. त्यामुळेच स्थानिक पातळीवर अनेकदा कोणत्याही पक्षाची कोणत्याही पक्षाशी युती होताना दिसून येते. गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षातील अतर्गत वाद अनेकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले आहे. स्थानिक मुद्द्यावरून अनेकदा महाविकास आघाडीतील पक्षांचे कार्यकर्ते सामने येताना दिसून आले आहे, हेच ओळखून नाना पटोलेंनी ही तयारी सुरू केली असावी.