तिकडे दिल्लीत मोदींचा शपथविधी, इकडे मुंबईत दोन ठाकरेंची भेट
मुंबई : दिल्लीत नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीत राष्ट्रपती भवनात संध्याकाळी 7 वाजता नरेंद्र मोदी आणि त्यांच्या 50 सहकाऱ्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तर इकडे मुंबईत राज्यातील दोन ‘ठाकरें’नी भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची भेट झाली. भेटीनंतर माणिकराव ठाकरे काय म्हणाले? “आज मी […]
मुंबई : दिल्लीत नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीत राष्ट्रपती भवनात संध्याकाळी 7 वाजता नरेंद्र मोदी आणि त्यांच्या 50 सहकाऱ्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तर इकडे मुंबईत राज्यातील दोन ‘ठाकरें’नी भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची भेट झाली.
भेटीनंतर माणिकराव ठाकरे काय म्हणाले?
“आज मी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या मोदी-शहाविरोधी भूमिकेबाबत एक विचार असल्याने ही भेट घेतली. कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. मोदी शहा यांच्या विरोधात राज ठाकरे यांची भूमिका होती म्हणून समाधान व्यक्त करण्यासाठी भेट घेतली.” असे माणिकराव ठाकरे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर सांगितले.
तसेच, राज ठाकरे यांना सोबत घ्यायचे का हे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असेही माणिकराव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे जी यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट व चर्चा. @RajThackeray @mnsadhikrut
— Manikrao Thakare (@Manikrao_INC) May 30, 2019
माणिकराव ठाकरेंची भेट महत्त्वाची का?
माणिकराव ठाकरे हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. तसेच, काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपदही माणिकराव ठाकरे यांनी सांभाळलं आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसमधील एक मोठं नाव म्हणून माणिकरावांकडे पाहिले जाते. दुसरीकडे, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महाराष्ट्रभर ताकद आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत मोदी-शाहविरोधी भूमिका घेत राज्यभर प्रचारसभा घेतल्या होत्या. या सर्व राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि माणिकराव ठाकरे यांच्या भेटीला महत्त्व आले आहे.
राज ठाकरे – शरद पवार भेट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी राज ठाकरे यांनी भेट घेतली.
काल शरद पवारांची भेट आणि आज माणिकराव ठाकरेंची भेट यामुळे राज ठाकरे पुन्हा एकदा नवी समीकरणं राजकारणात आणू शकतात का, या चर्चेला उधाण आलं आहे. राज ठाकरे हे आघाडीत जाणार का, हेही पाहावे लागणार आहे.
संबंधित बातम्या :