‘त्यांच्याइतकी संधी कुणालाच मिळाली नाही, आता काय पंतप्रधान…’, पृथ्वीराज चव्हाण यांचा टोला
"अजित पवारांना आणखी काय संधी मिळायला पाहिजेत होती. त्यांच्या इतकी संधी महाराष्ट्रामध्ये कोणालाही मिळाली नाही. त्यांनी अनेक वेळेला राजीनामा दिला. पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीबरोबर शपथ घेतली. तरी त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्री पद दिले", असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिरुर येथील सभेत बोलताना मनातील खदखद व्यक्त केली. “मी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती. पण केवळ मी साहेबांचा मुलगा नाही, म्हणून मला संधी मिळाली नाही; हा कोणता न्याय?”, असं अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टोला लगावला आहे. “अजित पवारांना आणखी काय संधी मिळायला पाहिजेत होती. त्यांच्या इतकी संधी महाराष्ट्रामध्ये कोणालाही मिळाली नाही. त्यांनी अनेक वेळेला राजीनामा दिला. पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीबरोबर शपथ घेतली. तरी त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्री पद दिले. त्यांना आणखी काय व्हायचंय? पंतप्रधान व्हायचं असेल तर शरद पवार करू शकत नाहीत”, असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.
यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या आगामी लोकसभा निवडणुकीत किती जागा जिंकून येतील? याबाबत महत्त्वाचं भाष्य केलं. “माझाही अंदाज असाच आहे की आमच्या महाविकास आघाडीच्या 30 पेक्षा जास्त कदाचित 35 पर्यंत जागा येण्याची शक्यता आहे”, असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. “१९७७ उदाहरण सांगतो. इंदिरा गांधी यांच्या विरोधात वातावरण होतं. एकही पंतप्रधान पदासाठी उमेदवार नव्हता. पण इथे दोन विचारांची लढाई आहे”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
‘100 दिवसात काळा पैसा आणणार होता, त्याचं काय झालं?’
“मला दुःख याचं आहे. वक्तव्य कुणी केलं, यापेक्षा मोदींनी याची सुरुवात केली आहे. ही भाषा मोदी-शाह यांनी बंद केली पाहिजे. पंतप्रधान यांच्याकडून माझी अपेक्षा ही दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेची आहे. त्याचं काय झालं? 100 दिवसात काळा पैसा आणणार होता, त्याचं काय झालं? सगळ्या बँकांची माहिती तुमच्याकडे आहे. या माहितीच्या आधारे तुम्ही ब्लॅकमेल करत आहात. तुम्ही धार्मिक ध्रुवीकरणबद्दल बोलता. काँगेस जाहीरनाम्यात नसलेलं मुद्दे मांडत आहात”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या निवडणुकीत 6 सभा घेतल्या. आता 12 सभा झाल्या आणखी घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात दोन वेळा मुक्काम केला. त्यांना माहीत आहे, त्यांचं सरकार येणार नाही. तुम्ही धार्मिक ध्रुवीकरण करत आहात. विशेष म्हणजे याबाबत निवडणूक आयोग गप्प आहे”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. “महाविकास आघाडीचं बहुमत असणार आहे. भाजपचा दारुण पराभव होणार आहे. ५-७ राज्यात भाजपच्या जागा कमी होतील”, असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.