उद्धव ठाकरे यांच्या पहिल्या यादीमुळे आज महाविकास आघाडीतील एक नेता बनू शकतो बंडखोर
उद्धव ठाकरे गटाने आज 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमुळे महाविकास आघाडीतील एक नेता अस्वस्थ झाला आहे. आज दुपारी मीडियाशी बोलून तो आपली पुढची भूमिका जाहीर करु शकतो. उद्धव ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केल्यानंतर काही घटक नाराज आहेत.
लोकसभा निवडणूक 2024 साठी उद्धव ठाकरे गटाने 17 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. ठाकरे गटाने दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई यांना उमेदवार बनवलय. दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई यांचा मुख्य सामना राहुल शेवाळे यांच्या विरुद्ध होणार आहे. राहुल शेवाळे यांनी 2014 आणि 2019 अशी दोनवेळा खासदारकीची निवडणूक जिंकली आहे. सध्या ते शिवसेना शिंदे गटामध्ये आहेत. उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकर यांना तिकीट देण्यात आलय. विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांचे ते सुपूत्र आहेत. गजानन किर्तीकर शिंदे गटासोबत आहेत. मुलगा अमोल उद्धव ठाकरे गटामध्ये आहे.
उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम नाराज झाले आहेत. निरुपम यांना उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी हवी होती. आज निरुपम मीडियाशी बोलून आपला पुढचा निर्णय जाहीर करणार आहेत. उमेदवारांच्या घोषणेवरुन स्पष्ट झालय की, उद्धव ठाकरे गट काँग्रेससमोर झुकलेला नाहीय. या लिस्टमध्ये 3 अशा जागा आहेत, जिथे काँग्रेसकडे उमेदवार होते. काँग्रेसकडून सुद्धा या जागांवर दावा सांगितला जात होता. दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाने अनिल देसाई यांना उमेदवारी दिलीय. काँग्रेसला मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यासाठी ही सीट हवी होती.
काँग्रेसची भूमिका काय असणार?
एक सांगलीची जागा आहे. काँग्रेसकडून इथे विशाल पाटील उमेदवार होते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे ते नातू आहेत. ठाकरे गटाने सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवार बनवलय. उत्तर पश्चिम मुंबईची तिसरी जागा आहे. अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी मिळालीय. काँग्रेसला ही जागा संजय निरुपम यांच्यासाठी हवी होती. शिवसेनेच्या घोषणेनंतर काँग्रेसची भूमिका काय असणार? याची उत्सुक्ता आहे.