शिंदेंनी कोल्हापुरात काँग्रेसला सुरुंग लावणं सतेज पाटील यांच्या जिव्हारी, म्हणाले, ‘हे क्लेशदायी…’
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील आमदार जयश्री जाधव यांच्या शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेशाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना जयश्री जाधव यांच्या निर्णयाला क्लेशदायी म्हटले आहे. त्यांनी फोडफोडीच्या राजकारणाचा निषेध केला असला तरी, कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसचाच उमेदवार विजयी होईल, असा दावाही त्यांनी केला.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या आमदार जयश्री जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्याने काँग्रेसला कोल्हापुरात मोठा फटका बसला आहे. कोल्हापूर उत्तरच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांना पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्या नाराज होत्या. त्याच नाराजीतून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. जयश्री जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जयश्री जाधव यांनी घेतलेला निर्णय हा क्लेशदायी असल्याचं म्हटलं आहे. तसेच “आम्ही फोडफोडी करणार नाही. पण आम्ही करेक्ट कार्यक्रम करणार”, असा इशारा सतेज पाटील यांनी शिवसेना आणि भाजपला दिला. त्याचबरोबर कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसचाच उमेदवार जिंकून येणार, असंही सतेज पाटील यावेळी म्हणाले.
“जी फोडाफोडी सत्ता स्थापन करताना झाली तशीच फोडाफोडी कोल्हापुरात झाली. कोल्हापुरातील काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांना पक्षात घेतलं. जे या पक्ष प्रवेशासाठी घेऊन गेलेत त्यांना जिंकण्याची खात्री नसल्याने हा प्रवेश करून घेतला. खासगी विमानाने त्यांना कोल्हापुरातून मुंबईला घेऊन गेले. त्यांच्यावर दबाव होता की, आणखी काय होतं हे जयश्री जाधव सांगतील. मात्र कोल्हापूरची जनता हे सहन करणार नाही. उमेदवारीबाबत त्यांच्याशी बोललो होतो, त्या नाराज नव्हत्या. मात्र कोणता दबाव त्यांच्यावर होता हे त्याच सांगतील”, असं सतेज पाटील म्हणाले.
‘जयश्रीताई यांनी घेतलेला निर्णय क्लेशदायी’
“जयश्रीताई यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं होतं. चंद्रकांत जाधव यांना निवडून आणण्यासाठी देखील जीवाचे रान केलं. किमान त्यांनी जाताना किंवा काही अडचण असेल तर माझ्याशी बोलायला पाहिजे होतं. आताचं जे कृत्य जयश्रीताई यांनी केलं ते जाधव कुटुंबाला शोभणारं नाही. जयश्रीताई यांनी घेतलेला निर्णय क्लेशदायी आहे. पण कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार आहे”, असा दावा सतेज पाटील यांनी केला.
‘फोडफोडी करणार नाही, करेक्ट कार्यक्रम करणार’
“जयश्री जाधव यांनी उमेदवारी मागितली होती. त्यांची इच्छा होती. पण मी वस्तुस्थिती समजावून सांगितल्यानंतर त्यांनी मान्य केलं होतं. आम्ही फोडफोडी करणार नाही. पण आम्ही करेक्ट कार्यक्रम करणार. राजेश क्षीरसागर यांना स्वतःच्या ताकदीवर निवडून येण्याचा विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी फोडाफोडीचे राजकारण सुरू केले”, अशी टीका सतेज पाटील यांनी केली. “अशा पद्धतीने फोडाफोडी करून कुणी कोंडीत पकडू शकत नाही. कोल्हापूरची जनता हे सहन करत नाहीत. जयश्री जाधव यांच्या प्रवेशाने आमचा विजय आणखी सुकर झालाय”, असं प्रत्युत्तर सतेज पाटील यांनी दिलं.
सतेज पाटील यांचं शिंदे-अजित पवारांवर निशाणा
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दीप दिवाळी घरातच साजरी करावी लागेल. कारण महाराष्ट्रातील जनता आमच्यासोबत असेल. महायुतीमधील खदखद बाहेर पडत आहे. नवाब मलिक यांच्याबाबत जे वक्तव्य करत होते ते आता पलटले. भाजप म्हणत होते ते सत्य असेल तर आता तिकीट द्यायला विरोध करायला पाहिजे होतं. मात्र मालिक यांच्या घरात दोन जागा दिल्या”, अशी टीका सतेज पाटील यांनी केली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्या आरोपांवर देखील सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “आर आर आबा यांनी केलेली सही दाखवणं हा गोपनीयतेचा भंग म्हणावा लागेल. ही सही अजित पवार यांना दाखवली कशी? हा दडपशाहीचा प्रकार म्हणावा लागेल. आर आर आबा हयात नसताना अजित पवार यांनी केलेलं वक्तव्य दुर्दैवी म्हणावं लागेल”, असं सतेज पाटील म्हणाले.