भुजबळांनी खासगीत म्हटले होते… काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा गौप्यस्फोट
छगन भुजबळ पक्षात वरिष्ठ असताना डावलले गेले. कारण तिकडे साठमारी होत आहे. त्यांच्या पक्षात ज्यांना जे मिळेत ते ते ओरबडून खाल्ले जात आहे. राज्यातील सरकार कमिशन खोर सरकार झाले आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात शांतता निर्माण होईल, अशी अपेक्षा होती. परंतु राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधील नाराजीनाट्याची चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती. परंतु महायुतीमधील वादामुळे ते शक्य झाले नाही. त्यानंतर राज्यसभेची पोटनिवडणुकीसाठी त्यांनी आपली इच्छा जाहीरपणे व्यक्त केली. त्यावेळी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे भुजबळ नाराज झाले.
भुजबळ यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला शुक्रवारी ‘रोखठोक’ मुलाखत दिली होती. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. त्याचे पडसाद दुसऱ्या दिवशी उमटले. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी छगन भुजबळ यांच्यासंदर्भात गौप्यस्फोट केला. त्यांची राष्ट्रवादी अजित पवार गटात जाण्याची इच्छाच नव्हती, असे त्यांनी आपणास खासगीत सांगितल्याचा दावा केला.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, छगन भुजबळ पक्षात वरिष्ठ असताना डावलले गेले. कारण तिकडे साठमारी होत आहे. त्यांच्या पक्षात ज्यांना जे मिळेत ते ते ओरबडून खाल्ले जात आहे. राज्यातील सरकार कमिशन खोर सरकार झाले आहे. त्यांनी खरेदीचा सपाटा लावला आहे. छगन भुजबळ साहेबांची अजित पवार यांच्याबरोबर जाण्याची इच्छा नव्हती. ते खासगीरित्या बोलले होते. आज त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांनी त्यांच्या भुजांमधील बळ दाखवावेत. तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो, असे करण्यात काहीच अर्थ नाही. आता एक तुकडा दोन घाव त्यांनी करावे. त्यांच्याकडून आम्हाला ती अपेक्षा आहे. अंगावर आले म्हणून शिंगावर घेणार व्यक्ती ते आहे. परंतु आता कुरकुर करतात. ही अपेक्षा त्यांच्याकडून नाही.
दबावामुळे भुजबळ गेले…
भुजबळ दबावामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. तेच नाही तर अनेक जण असे म्हणतात. भुजबळ तर शेवटच्या टप्प्यात गेले. त्यांची इच्छा नव्हती. परंतु तपास संस्थांच्या दबाव आणून अनेकांना नेण्यात आले. आता भुजबळांनी तेथेच राहावे. अजित पवार यांनी तेथेच भाजपसोबत राहावे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता त्यांच्याकडून सत्ता काढून आम्हाला देईल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.