EXCLUSIVE | फडणवीसांच्या लेटरबॉम्बवर काँग्रेस आणि शरद पवार गटाची भूमिका काय?
देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र पाठवलेल्या एका पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आता अजित पवार काय भूमिका घेतात? याकडे राज्याचं लक्ष असणार आहे. असं असताना आता शरद पवार गट आणि काँग्रेसची भूमिका समोर आली आहे.
नागपूर | 7 डिसेंबर 2023 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवलं आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यास स्पष्टपणे विरोध केला आहे. नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहासारखे गंभीर आरोप आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध होणं अजून बाकी आहे. पण त्यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यास भाजपचा विरोध आहे, अशी स्पष्ट भूमिका देवेंद्र फडणीस यांनी पत्राद्वारे मांडली आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अजित पवारांनी आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना नवाब मलिकांचं स्वागत करत असल्याचं म्हटलं होतं. पण आता फडणवीसांनी मलिकांना महायुतीत सहभागी करुन घेण्यास विरोध केल्याने अजित पवार काय भूमिका घेतात? याकडे महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. असं असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाची भूमिका समोर आली आहे.
काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रावर भूमिका स्पष्ट केलं आहे. “नवाब मलिक यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य नव्हते, दुर्दैवाने त्यांना तुरुंगात राहावं लागलं. नवाब मलिक यांनी प्रतिज्ञापत्र करत अजित पवार गटाला पाठिंबा दिला हे मात्र खरंय. नवाब मलिक अजित पवार गटासोबत आहेत म्हणजेच महायुतीसोबत आहेत. विधान परिषदेत आज आरोप झाल्यानंतर एक रणनीतीचा भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिले असेल किंवा ट्विट केलं असेल”, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
‘भाजपला या वादातून सुटका मिळवायची असेल म्हणून…’
“उलट पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून नवाब मलिक यांना त्यांच्या मतदारसंघासाठी भरपूर निधीही दिला आहे आणि तो निधी त्यांना महायुतीचा आमदार असं गृहीत धरून दिला आहे. आता भाजपला या वादातून सुटका मिळवायची असेल म्हणून फडणवीस यांनी पत्र लिहून तसा प्रयत्न केला असावा. ही मुळीच महायुतीमध्ये वादाची सुरुवात नाही तर हे पत्र म्हणजे महायुतीच्या रणनीतीचा भाग आहे”, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.
“नवाब मलिक यांचा उल्लेख सभागृहमध्ये यापूर्वी देशद्रोही म्हणून केला गेला. त्यामुळे देशद्रोही माणूस आपल्या बाजूला बसला तर अनेक प्रश्न निर्माण होतील. त्यातून आपली सुटका व्हावी यासाठी हे प्रयत्न असावे. महायुतीला ते सोबतही पाहिजे आणि जवळही नको. भाजप हुशार पक्ष आहे, फार हुशार आणि धूर्त राजकारण्यांचा पक्ष आहे, ते याच्यातून मार्ग काढतील. नवाब मलिक यांना आम्ही निमंत्रण देणार नाही. आम्ही आता विरोधात आहोत. तसंही तो राष्ट्रवादीशी संबंधित प्रश्न आहे. आमच्या पक्षाशी संबंधित नाही”, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.
‘नवाब मलिक आमचे भाऊ’, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रावर भूमिका मांडली आहे. “नवाब मलिक हे फक्त राष्ट्रवादीचे नाही, तर महाराष्ट्राचे नेते आहेत. भाजपच्या विरोधात ते ताकदीने लढले आहेत. आमच्याकडून नवाब मलिकांचा सन्मान होईल. ते माझ्यासाठी आमच्या कुटुंबातील भाऊ आहेत. त्यांच्यावर अजून आरोप सिद्ध झालेले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिलं असेल तर ते दुर्दैवी आहे. महाराष्ट्राचं राजकारण खालच्या पातळीवर गेलं आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाले आहेत.
“नवाब मलिक जामिनावर आहेत. सुप्रिया सुळे सत्याच्या बाजूने असते. भुजबळ अडचणीत असताना जेलमध्ये गेले होते. जे कोणी जेलमध्ये गेले ते पोलिटकॉल विक्टिम म्हणून गेलेत. नवाब भाईंवर आरोप झालेत ते दूर्देवी आहेत. नवाब मलिकांनी पक्ष वाढीत काम केलं आहे. अजित पवार गट वेगळा झाला आहे तर ते असं वागवत असतील तर योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडे अध्यक्ष शरद पवार आहेत”, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली आहे.