Rajya Sabha Election : विधानपरिषदेच्या 2 जागांसाठी काँग्रेस, NCP आग्रही, शिवसेना तडजोड करणार?
राज्यसभा जागेच्या बदल्यात विधानपरिषदोच्या एका जागेवरुन महाविकास आघाडीत चर्चा झाल्याची माहिती.
मुंबई : राज्यसभा (Rajya Sabha election) जागेच्या बदल्यात विधानपरिषदेच्या एका जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये चर्चा झाल्याची माहिती. काँग्रेस (Congress) आणि एनसीपी (NCP) विधानपरिषदेच्या दोन जागा लढवण्यासाठी आग्रही आहे. तर शिवसेनेनं दोन राज्यसभेच्या जागा लढवायच्या असेल तर एक जागा विधान परिषदेची कमी लढवावी, अशी भूमिका काँग्रेस आणि एनसीपीच्या नेत्यांची आहे, असी माहिती सूत्रांनी दिली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर ही बैठक सुरू आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा सागर बंगल्यावर बैठक सुरू होती. या बैठकीला महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आहे. यामध्ये छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सागर बंगल्यावर अनिल देसाई, सुनील केदार, सतेज पाटील या नेत्यांचा उपस्थिती आहे.
भाजपची काय भूमिका?
राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार लढवण्यावर भाजप ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता निवडणूकीतून माघार नाहीच, अशी भूमिका भाजपकडून घेण्यात आली आहे. तिसऱ्या उमेदवारासाठी मतांची जुळवाजुळव झाल्याचाही भाजपमधील सूत्रांकडून करण्यात आलाय. राज्यसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. अशातच भाजप उमेदवारी अर्ज माघारी घेणार नाही, असं सांगितलं जातंय.
कुणाला उमेदवारी?
आता राज्यसभा निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे. शिवसेनेने आपले दोन उमेदवार संजय राऊत आणि संजय पवार हे जाहीर केले आहे. त्यानंतर राष्ट्रवादीकडूनही प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपने तीन उमेदवार जाहीर केले आहे.
6 जागासाठी 7 उमेदवार रिंगणात
- संजय राऊत, शिवसेना
- संजय पवार, शिवसेना
- प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी
- इम्रान प्रतापग्रही, काँग्रेस
- पियुष गोयल, भाजप
- अनिल बोंडे, भाजप
- धनंजय महाडिक, भाजप
काँग्रेसनेही उमेदवरांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसकडून जाहीर झालेलं नावं हे अपेक्षेप्रमाणेच सरप्राईजिंग आहे. कारण राज्यसभेसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातून इम्रान प्रतापग्रही यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
कोण आहेत इम्रान प्रतापग्रही?
- मोहम्मद इम्रान प्रतापग्रही हे उर्दू भाषेतील कवी आणि मूळचे उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे नेते आहेत.
- प्रतापग्रही हे 2019 च्या निवडणुकीत मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढले मात्र ते पराभूत झाले.
- इम्रान यांची 3 जून 2021 रोजी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
- यावेळी काँग्रेसकडून त्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाण्याची संधी देण्यात आली आहे. तसेच काँग्रेसकडून कन्हैया कुमार यांचेही नाव चर्चेत होते. मात्र आता त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.