‘लडका छोटा हैं तो क्या हुआ?, बडा हमें ही करना हैं’, सत्यजीत तांबेंसाठी अहमद पटेलांचा थेट ठाकरेंना फोन
राजकारणातील चाणक्य गेला, एका पर्वाचा अंत झाला, अशा शब्दात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्यसभा खासदार अहमद पटेल यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षावर दु:खाचा आघात झालाय. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी अतिशय भावूक होत त्यांना ट्विटरद्वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे. राजकारणातील चाणक्य गेला, एका पर्वाचा अंत झाला, अशा शब्दात तांबे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Congress Satyajeet tambe tribute Ahmed Patel through tweet)
एका पर्वाचा अंत… राजकारणातील चाणक्य अहमदभाई यांच्या निधनाच्या बातमीने मन सुन्न झाले. सर्वांचे बोलणे शांतपणे ऐकून घेणारे, मध्यरात्री पर्यंत कार्यालयात बसून लोकांना भेटणारे, देशातील रथी-महारथींपासून सामान्य माणसापर्यंत सर्वांना आपलेसे वाटणारे अहमद भाई गेलेत. भावपूर्ण श्रध्दांजली, असं सत्यजीत तांबेंंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सत्यजीत तांबेंनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना अहमद पटेल यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. “खास माझ्यासाठी अहमद पटेल यांनी रात्री 1 वाजता तत्कालिन महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना फोन केला होता. त्यांच्यासाठी पार्टीचा छोटा कार्यकर्ता आणि नेता समानच असायचा. पक्षातल्या सगळ्या लोकांच्या शंकांचं निरसन ते अगदी खुबीने करायचे. त्यांच्या जाण्याने आमच्यासाठीचं हक्काचं ठिकाण आम्ही कायमस्वरुपी गमावलं”, अशा शब्दात तांबेंनी आपलं दु:ख व्यक्त केलं.
सत्यजीत तांबे म्हणाले, “अहमदनगर जिल्हा परिषदेला 2009 साली मला अध्यक्ष व्हायचं होतं. तशी तयारी सुरु होती. परंतु तत्कालिन काँग्रेसचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे ते शक्य नसल्याचं दिसत होते. पक्षातलीही बरीच माणसं माझं फक्त म्हणणं ऐकून घेत होती परंतु कार्यवाही मात्र होत नव्हती. मग मी अहमद पटेल यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. अहमदभाईंची रात्री 1 वाजता मला अपॉइंटमेंट मिळाली. रात्री 1 वाजता त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी माझी नेमकी अडचण समजून घेतली. मी माझी सविस्तर अडचण त्यांच्या कानावर घातली. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी थेट तत्कालिन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना फोन लावला. त्यावेळी माणिकराव ठाकरे कदाचित झोपले असावेत. त्यामुळे त्यांना आवाज ओळखू आला नसेल. कोण बोलतंय म्हणून ठाकरेंनी तीन वेळा विचारलं… त्यावर मैं अहमदभाई पटेल बोल रहाँ हूँ… असं भारदस्त आवाजात भाईंनी सांगितलं. त्यानंतर मूळ विषयाला हात घालत अहमदनगर जिल्हा परिषदेसाठी तांबेंना का संधी देत नाही? असं अहमद पटेल यांनी माणिकराव ठाकरेंना विचारलं. त्यावर ‘साहाब ओ लडका NSUI का लडका हैं… उमर से छोटा हैं… उसे वक्त हैं… असं माणिकराव ठाकरे अहमद पटेलांना म्हणाले. त्यावर ‘छोटा हैं तो क्या हुआ, बडा भी हमको ही करना हैं’… असं अहमदभाई माणिकरावांना म्हणाले. अहमदभाईंच्या फोननंतर दोनच दिवसांत पक्षाने माझ्या नावाचा व्हिप काढला. म्हणजे एखाद्या छोट्या कार्यकर्त्यासाठी थेट पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला फोन लावणं हे फक्त अहमदभाईच करु शकतात, अशा भावना व्यक्त करताना सत्यजीत तांबेंना गदगदून आलं होतं.
कोण आहेत अहमद पटेल?
अहमद पटेल हे सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय आणि अत्यंत विश्वासू म्हणमून ओळखले जायचे. सोनिया गांधींना राजकारणात स्थिरावण्यासाठी पटेल यांनी मोठी मदत केली. गांधी कुटुंबासह काँग्रेसविषयी खडान्-खडा माहिती अहमद पटेल यांना होती. तसंच जेव्हा पक्षहिताचा प्रश्न यायचा, तेव्हा सोनिया गांधी अहमद पटेल यांचा सल्ला अंतिम मानायच्या. एकूणच गांधी कुटुंब आणि काँग्रेसमध्ये अहमद पटेल यांना मानाचं स्थान होतं.
त्यांच्या जाण्याने काँग्रेसची मोठी हानी झालीये. देशभरात काँग्रेसची पिछेहाट होताना त्यांच्या अकाली जाण्याने काँग्रेस नेत्यांना तसंच कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसलाय. ट्विटर, फेसबुकद्वारे नेते, कार्यकर्ते पटेल यांच्याप्रति आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
(Congress Satyajeet tambe tribute Ahmed Patel through tweet)
संबंधित बातम्या
अहमद पटेल यांचं दु:खद निधन, गुजरात युवक काँग्रेसचे अध्यक्ष ते काँग्रेसचे ‘चाणक्य’ पर्यंतचा प्रवास
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अहमद पटेल यांचे निधन, मुलगा फैजल पटेल यांची ट्विटरद्वारे माहिती