औरंगाबादच्या जागेवरुन आघाडीत तिढा, तरीही काँग्रेसकडून उमेदवाराची चाचपणी सुरु
औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या रस्सीखेच सुरु आहे. शिवाय, राज्य आणि केंद्रीय पातळीवर जागावाटपाचा तिढा औरंगाबादच्याच जागेवरुन सुटत नाहीय. असे एकीकडे असताना, काँग्रेसने औरंगाबादच्या जागेसाठी आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकलं आहे. गेल्या चार निवडणुकीत सहजपणे विजय मिळवणारे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवाराची चाचपणी काँग्रेसकडून सुरु […]
औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या रस्सीखेच सुरु आहे. शिवाय, राज्य आणि केंद्रीय पातळीवर जागावाटपाचा तिढा औरंगाबादच्याच जागेवरुन सुटत नाहीय. असे एकीकडे असताना, काँग्रेसने औरंगाबादच्या जागेसाठी आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकलं आहे. गेल्या चार निवडणुकीत सहजपणे विजय मिळवणारे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवाराची चाचपणी काँग्रेसकडून सुरु आहे. जातीय समीकरण, पक्षाची ताकद यावरुन लोकसभेत बाजी मारण्याचे मनसुबे सध्या आखले जात आहेत.
गेल्या महिनाभरापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा कायम आहे. मात्र, औरंगाबाद काँग्रेसने आज राष्ट्रवादी काँग्रेसला जबर झटका दिलाय. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा काँग्रेसची ताकद अधिक असल्याचं सांगत लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरु केलीय. आज औरंगाबाद शहरातील काँग्रेस भवनमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. या उमेदवारांची नावेही प्रदेश पातळीवर पाठवल्यानंतर तिथून उमेदवारांची निश्चिती केली जाणार आहे. काँग्रेसनेही नव्या समीकरणातून नव्या चेहऱ्याचा शोध घ्यायला सुरुवात केलीय.
औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. खासदार चंद्रकांत खैरे हे चार टर्मपासून निवडून येत आहेत. मात्र, मागच्या निवडणुकीत मोदी लाट असताना त्यांच्या मताधिक्क्यात घट झाली. शिवाय, यंदा केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणावर मतदार नाराज असल्याचा कयास काँग्रेस नेते लावत आहेत. त्यामुळे जातीय समीरकरण डोळ्यासमोर ठेवून तुल्यबळ उमेदवार द्यायचा, अशी आखणी काँग्रेसने केलीय. त्यामुळे राज्य पातळीवर रस्सीखेच सुरु आहे. आता यातून आमदार सुभाष झाबड, माजी आमदार कल्याण काळे, नामदेव पवार, डॉ. रवींद्र बनसोड यांची नावे समोर आणली आहेत.
यंदा मराठा क्रांती मोर्चाच्या विविध घटनांमुळे औरंगाबाद जिल्हा ढवळून निघाला होता. त्यामुळे मराठा उमेदवार मैदानात उतरवण्याचे डाव काँग्रेसचे आहेत. मात्र राष्ट्रवादी आग्रही असताना काँग्रेसने घेतलेल्या मुलाखती अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीला जागा सोडण्यास नकार असल्याचा इशाराच आहे हे नक्की.