Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्नाटकात काँग्रेसच्या विजयाने तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नांना मोठा झटका, पाहा काय होणार परिणाम

कर्नाटकात काँग्रेसचा दणदणीत विजय इतर राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. कसा ते जाणून घ्या. काँग्रेसच्या विजयाने लोकसभा निवडणुकीत कसा होणार परिणाम.

कर्नाटकात काँग्रेसच्या विजयाने तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नांना मोठा झटका, पाहा काय होणार परिणाम
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 11:22 AM

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. काँग्रेस पक्षााठी हा विजय संजीवनी ठरला आहे. काँग्रेसच्या या विजयाने मात्र तिसऱ्या आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कारण काँग्रेसला सोडून इतर विरोधक राजकीय पक्ष भाजप विरोधात एकत्र येण्यासाठी योजना आखत असताना काँग्रेसचा हा विजय त्यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. देशभरातील विरोधकांना एकत्र आणण्यासाठी सध्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार प्रयत्न करत आहेत. वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना ते भेटत आहेत. मात्र काँग्रेसला सोडून तिसरी आघाडी बनवण्याचा हा प्रयत्न फसू शकतो.

जेडीयू नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधकांना एकत्र करण्याची कसरत सुरू केली होती. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची देखील भेट घेतली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि डाव्या पक्षांचे नेते सीताराम येचुरी आणि डी राजा यांसारख्या मोठ्या नेत्यांची भेट घेतली होती.

पंतप्रधानपदाचा चेहरा कोण?

राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द झाले. त्यानंतर नितीशकुमार यांनी विरोधकांना एकत्र करण्याची कसरत सुरू केली. नितीश कुमार यांच्या या प्रयत्नामागे अशा शक्यता वर्तवल्या जात आहे की, जर राहुल गांधी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवू शकले नाहीत तर नितीश कुमार पंतप्रधानपदासाठी विरोधकांचा चेहरा बनू शकतात आणि या निवडणुकीत नरेंद्र मोदींशी टक्कर देऊ शकतात. याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी देखील विरोधकांनी मुठ बांधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना काही यश आले नाही. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अनेक नेते आहेत. काँग्रेसला सोडून काहींनी तिसरी आघाडी बनवण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रेस अशावेळी विजयी मिळवून पुन्हा शर्यतीत येते.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे काँग्रेसकडे दुर्लक्ष करणाऱ्या नेत्यांना पुन्हा विचार करावे लागणार आहे. या विजयाने काँग्रेसचा आत्मविश्वास उंचावला आहे. राहुल गांधी पुढचे पंतप्रधान होऊ शकतात असं सिद्धरमैया म्हणाले. त्यामुळे राहुल गांधी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आलेत.

नीतीश कुमार यांना धक्का

कर्नाटक निवडणुकीत भाजपचा विजय झाला असता तर इतर पक्षांनी काँग्रेसला आणखी लक्ष्य केलं असतं. याचा थेट फायदा नितीशकुमारांना झाला असता. पण आता तसं होणार नाही. लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरु शकते. पण त्यासाठी त्यांना थेट भाजपशी म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी या नावाला टक्कर द्यावी लागणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीत मतदार हे पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण याकडे बघून मतदान करणार आहेत. विरोधकांकडे अजून चेहरा नाही. काँग्रेसकडून राहुल गांधी यांना प्रोजेक्ट केले जात आहे. पण एकट्या काँग्रेसला बहुमत मिळवणं कठीण आहे. भाजपच्या जागा कमी झाल्या तरी इतर राजकीय पक्षावर काँग्रेसला अवलंबून राहावे लागणार आहे.

पंतप्रधानपदासाठी अनेक इच्छुक

उद्धव ठाकरे हे देशाचं नेतृत्व करु शकतात असं संजय राऊत यांनी याआधी ही म्हटलं आहे. शरद पवार यांचं नाव अनेकदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत राहिलं आहे. ममता बॅनर्जी यांची देखील पंतप्रधान बनवण्याची इच्छा आहे. याशिवाय अनेक राज्यांचे मुख्यंमत्री आहेत ज्यांना पंतप्रधानपदाच्या शर्यतीत येण्याची इच्छा आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीचा निर्णय या सर्वांचं भविष्य ठरवणार आहे. पण यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं. कारण विधानसभेत इतर पक्षाला मतदान करणारे मतदार पंतप्रधान म्हणून मोदींनाच पसंती देतात. असं अनेक वेळा वेगवेगळ्या सर्व्हमधून पुढे आलं आहे.