कराड (सातारा) : मलाकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत पृथ्वीबाबाच हिरो ठरले आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनलेल्या या निवडणुकीची चुरस वाढली होती. मात्र, भाजपला लोळवत पृथ्वीबाबांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. विधानसभा निवडणुकीआधी साताऱ्यात अत्यंत महत्त्वाची मानली गेलेल्या या निवडणुकीत भाजपनेही मोठी ताकद लावली होती. मात्र, पृथ्वीबाबांसमोर भाजपला काही खास प्रभाव दाखवता आलेला नाही.
भाजपकडून पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले हे निवडणुकीचं नेतृत्त्व करत होते. डॉ. अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या पराभवासाठी मोठी तयारी केली होती. अगदी राज्याचे महसूलमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनाही मलकापुरात प्रचारासाठी आणले होते. मात्र, त्यांचाही काही विशेष प्रभाव दिसला नाही.
मलकापूर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने 19 पैकी 14 जागांवर विजय मिळवत, घवघवीत यश मिळवले आहे. तर भाजपने सर्व ताकद पणाला लावूनही, 19 पैकी केवळ 5 जागा मिळवल्या आहेत. शिवाय, नगराध्यक्षपदीही काँग्रेसच्या उमेदवार निलम येडगे यांचा 270 मतांनी विजय झाला आहे.
मलकापूर नगरपालिका निवडणुकीत विजय मिळवत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एकप्रकारे कराडमधील आपलं वजन दाखवून दिलं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मलकापूर निवडणुकीचे निकाल महत्त्वाचे ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
मलकापूर नगरपालिका निवडणूक : माजी मुख्यमंत्र्यांचे भवितव्य मतपेटीत बंद
कराडमधील मलकापूर नगरपालिकेच्या प्रचाराचा धुरळा उडाला!
मलकापुरात कोण जिंकणार? माजी मुख्यमंत्री की माजी मुख्यमंत्र्यांचा जावई?
कराड नगरपरिषद निवडणूक जाहीर, माजी मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला