Eknath Shinde : 16 बंडखोरांच्या निलंबनाविरोधात कोर्टात जाणार, 7 एवजी 2 दिवसांची मुदत कशी? शिंदे गटाचा सवाल
तुम्ही माझ्या ऑफिसवर दगडफेक केली. अशा वेळी मी शांत बसणार आहे. आपल्या माणसांच्या विरुद्ध काय लढायचं ओ. आम्हाला सुद्धा येतं ना. राणेंच्या विरुद्धही लढून दाखवलंय ना. तुम्ही रस्त्यावर का येता. असं नका करु. पुन्हा पुन्हा मी विनंती करतोय.' असं केसरकर 'टीव्ही9 मराठी'सोबत बोलताना म्हणाले.
मुंबई : एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) विरुद्ध ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत चालला असून आता उपाध्यक्ष झिरवळ यांच्या निर्णयाविरोधात बंडखोरांचा गट कोर्टात (Court) जाणार असल्याची माहिती आहे. निलंबनासाठी सात दिवसांची मुदत दिली जाते. त्याऐवजी आम्हाला 2 दिवसच मुदत का दिली जाते. याची आम्ही दाद मागू, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. गटनेतेपदी शिवसेनेनी केलेली नियुक्ती अवैध आहे. या नियुक्तीला आम्ही कोर्टात आव्हान देणार असल्याचंही शिंदे गटाकडून सांगतिलं जातंय. मुळ मुद्याला बगल दिली जातेय. झिरवळांविरोधात कोर्टात जाण्यावर आम्ही ठाम असल्याचंही शिंदे गटाकडून सांगितलं जातंय. 16 बंडखोरांच्या निलंबनाविरोधात कोर्टात जाणार असल्यानं आणखी वाद चिघळण्याची शक्यताय.
केसरकर नेमकं काय म्हणालेत?
बंडखोर आमदार केसरकर ‘टीव्ही9 मराठी’सोबत बोलताना म्हणाले की, ‘कायदेतज्ज्ञांची मदत घेणार. सुरुवातीला हायकोर्टातच जावं लागेल. गरज लागली तर सुप्रीम कोर्टात जाऊ. आमची रोजच बैठक होते. आम्हाला कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर आमचा गट फॉर्म करावा लागले. त्याआधी आम्ही काहीही करु शकत नाही. आम्ही आजही शिवसेनेत आहोत आणि उद्याही राहणार आहोत. शिवसैनिकांना भडकवलं जातंय. मी शांत डोक्याचा आहे. तुम्ही माझ्या ऑफिसवर दगडफेक केली. अशा वेळी मी शांत बसणार आहे. आपल्या माणसांच्या विरुद्ध काय लढायचं ओ. आम्हाला सुद्धा येतं ना. राणेंच्या विरुद्धही लढून दाखवलंय ना. तुम्ही रस्त्यावर का येता. असं नका करु. पुन्हा पुन्हा मी विनंती करतोय.’ असं केसरकर ‘टीव्ही9 मराठी’सोबत बोलताना म्हणाले.
मुक्काम वाढला, निलंबनाचाही धोका
एकनाथ शिंदे गटानं शिवसेनेला भाजपसोबत पुन्हा युती करण्याचा सल्ला दिलाय. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देखील सत्तेसाठी चाचपणी सुरू असल्याचं दिसतंय. पण, भाजप सावध पवित्रा घेऊन सत्तेची गणितं जुळवत असल्याचं बोललं जातंय. यामुळे शिंदे गटाला प्रत्येक निर्णय हा विचार करून घ्यावा लागत असल्याचं दिसतंय. कारण, शिवसेनेत परतीचे दोर आता पूर्णपणे कापले गेले आहेत. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी केलेल्या जहरी टिकेवरुन ते स्पष्ट देखील झालंय.