Big Breaking : बृजभूषण सिंहांविरोधात दादर पोलीस स्थानकात मनसेची तक्रार! खालच्या भाषेत केलेलं वक्तव्य भोवणार?
मनसे भाजप खासदार बृजभूषण सिंग यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार. नवा वाद पेटण्याची शक्यता
मुंबई : भाजप खासदार बृजभूषण सिंहांविरोधात (Brijbhushan Singh) दादर पोलीस (Dadar Police) स्थानकात मनसेनं (MNS) तक्रार दाखल केली आहे. दादार मधील मनसे पदाधिकारी आणि मनसे जनहीत कक्षाचे वकील दादर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. भाजप खासदार बृजभूषण सिंग यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी दादर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी रितसर तक्रा दिली आहे. मनसेचे उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी ही तक्रा दिली आहे. बृजभूषण सिंग यांनी राज ठाकरे यांच्या बद्दल खालच्या भाषेत केलेल्या या वक्तव्यावरून तक्रार देण्यात आली आहे. दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण करणं आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत ही तक्रार देण्यात आली आहे. बृजभूषण सिंग यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी तक्रार पाटील यांनी केली आहे. मनसेचे जनहीत कक्षाचे वकील ॲड गजणे , ॲड. रवी पाष्टे , उपविभाग अध्यक्ष शशांक नागवेकर सह कार्यकर्त्यांनी दादर पोलीस स्थानाकात जाऊन ही तक्रार दिली.
बृजभूषण सिंह काय म्हणाले?
टीव्ही 9 सोबत बातचित करताना बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलं होतं. त्यांना विचारण्यात आलं की राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत काय सांगाल त्यावर ते म्हणाले की, “राज ठाकरेंचा बापही अयोध्येत येऊ शकणार नाही.”
“बिहारचा बक्सर हा असा भाग आहे, जिथे भगवान रामने शिक्षा ग्रहण केली होती. विश्वमित्रने लंका अभियानाची योजना इथूनच तयार केली. त्याच धरतीवरून आम्ही अयोध्या आंदोलनासाठी समर्थन मागायला आलोय”, असंही बृजभूषण सिंह म्हणाले होते.
“माफी मागा मगच अयोध्येत या”
गुढी पाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी भोग्यांना मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर त्यांची प्रतिमा हिंदुत्वाचा नवा चेहरा म्हणून लोक राज ठाकरेंविषयी चर्चा करू लागले. अश्यात हिंदुत्वाचा मुद्दा अधिक व्यापक करण्यासाठी आणि राष्ट्रीय स्तरावर हिंदुत्वाचा मुद्दा पोहोचवण्यासाठी राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. पण त्याच वेळी उत्तर प्रदेशमधले खासदार बृजभूषण सिंह यांनी त्यांना आव्हान दिलं. याआधी अनेकदा राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात परप्रांतियांच्या मुद्द्यावरून उत्तर भारतीयांना सुनावलं. त्याचाच धागा धरत बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत यायचं असेल तर उत्तर भारतीयांची माफी मागावी लागेल, अन्यथा अयोध्येत पाय ठेव देणार नाही, असं खुलं आव्हान दिलं. त्यांचं ते आव्हान आधी मनसेला तितकंच गंभीर वाटलं नाही. पण जेव्हा त्याचे पडसाद उमटू लागले तेव्हा मात्र राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केला. त्यानंतर बृजभूषण सिंह यांनी आज पुन्हा एकदा मनसे आणि राज ठाकरे यांना ललकारलं आहे.