मुंबई: दादरा नगर-हवेली लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर यांच्या विजयानंतर शिवसेना खासदार संजय राऊत दिल्लीत धडका मारायची भाषा करत आहेत. परंतु कलाबेन डेलकर शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या नाहीत. त्या अपक्ष खासदार आहेत. त्यामुळे उद्या त्या भाजपमध्येही येऊ शकतात. तेव्हा संजय राऊत यांनी बोंबलत बसू नये, अशी टीका भाजप खासदार नारायण राणे यांनी केली. ते शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.
दादरा नगर-हवेलीमध्ये यापूर्वी मोहन डेलकर सातवेळा निवडून आले होते. आता त्यांची पत्नी निवडून आली. यामध्ये शिवसेनेचा कोणताही वाटा नाही. तिथे शिवसेनेचा साधा शाखाप्रमुखही नाही. पण निवडणूक जिंकल्यानंतर श्रेय घेण्यासाठी शिवसेना सर्वात पुढे नाचत आहे. काही काळाने कलाबेन डेलकर भाजपमध्ये येतील तेव्हा शिवसेनेने बोंबलत बसू नये, असे नारायण राणे यांनी म्हटले.
आम्ही 303 पेक्षा अधिक आहे. तुम्ही एकने धडक मारणार. दिल्लीला धडक मारायला आल्यावर डोकं जागेवर राहणार नाही. संजय राऊत डोक्याविना दिसतील. दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे करण्याची सवय शिवसेनेला आहेच. डेलकर निवडून आल्यावर आम्हाला मोठं यश आलं. आम्ही दिल्ली काबीज करणार, अशा गोष्टी संजय राऊतांनी लिहिल्या. लिखाण करताना त्यांना भान राहत नाही. रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने राऊतांना भान राहत नाही वाटतं, असेही राणे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस आणली नसती तर महाराष्ट्रात कोरोना मृतांची संख्या कितीवर गेली असती याचा विचार करावा. नरेंद्र मोदी यांच्यामुळेच शिवसेनेचे 56 आमदार आणि 18 खासदार निवडून आले. पुढच्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढल्यास इतके आमदार-खासदार निवडून येणार नाहीत, असे नारायण राणे यांनी म्हटले.
यावेळी राणेंनी शरद पवार आणि काँग्रेसच्या विरोधात शिवसेनेने दिलेल्या हेडिंगच वाचून दाखवल्या. काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे अधू मेंदूचे लोक आहेत. प्रत्येक ठिकाणी सिंचनाचे प्रकल्प तुमच्या दिवट्याने कसे अर्धवट टाकले हे पाहा, अशा हेडिंग सामनाने दिल्या होत्या. आज मात्र ते पवार आणि काँग्रेसचे गुणगाण गात आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.
असं त्यांनी लिहिलं होतं.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्राच्या सत्तेला टक्कर देण्याची भाषा केली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. संजय राऊत सरकलाय. एका माणासमुळे सत्ता बदलणार? मग मॅजोरिटी वगैरे कशासाठी हवी? असा सवालही त्यांनी केला.
संबंधित बातम्या:
दुसऱ्यांच्या मुलाचं बारसं करण्याची शिवसेनेला सवयच; नारायण राणेंची फटकेबाजी
रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने संजय राऊतांना भान राहत नाही, नारायण राणेंचा हल्लाबोल