15 दिवसांत काका-पुतण्या 4 वेळा एकत्र, बैठका अन् चर्चांचं सत्र, अजितदादा- शरद पवार यांच्यात चाललंय काय?
खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली आहे. पुण्यातील साखर संकुलात ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

पवार कुटुंबातील नेते तथा आमदार रोहित पवार यांनी राज्यातील सर्वच कुटुंबांनी एकत्र यावं अशी साद उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरद पवार यांना घातली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी सोशल मीडियावर ही भूमिका मांडली आहे. एकीकडे राजकीय घराण्यांच्या मनोमिलनाच्या चर्चा रंगलेल्या असताना दुसरीकडे पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांच्यात एक बैठक पार पडली आहे. गेल्या पंधरा दिवसांत हे दोन्ही नेते चार वेळा एकत्र आले आहेत. त्यामुळेच आता दोन्ही राष्ट्रवादींमध्ये नेमकं काय चाललंय? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
पुण्यात दोन्ही नेते एकत्र 15 मिनिटे स्वतंत्र बैठक
खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली आहे. पुण्यातील साखर संकुलात ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. पवार घराण्यातील नेते तथा आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी अजित पवार आणि शरद पवार यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. असे असतानाच आता या दोन्ही नेत्यांत पुण्यात बैठक पार पडली आहे. या बैठकीला दोन अधिकारीही उपस्थित होते.
अगोदर कृषीक्षेत्राविषयी बैठक, नंतर…
शरद पवार यांच्या दालनात ही बैठक झाली आहे. ही बैठक नेमकी कशासंदर्भात होती हे नेमकं समजू शकलेलं नाही. ही बैठक होण्याआधी कृषी क्षेत्रातील एआय वापराबाबत बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार-शरद पवार यांच्यासोबत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक मंडळही उपस्थित होते. या बैठकीनंतर शरद पवार-अजित पवार यांच्यात 15 मिनिटे स्वतंत्र बैठक झाली. यावेळी दोन अधिकारी उपस्थित होते.
15 दिवसांत चौथ्यांदा भेट
गेल्या पंधरा दिवसांत शरद पवार आणि अजित पवार हे वेगवेगळ्या कारणामुळे एकूण चार वेळा एकत्र आले आहेत. पुण्यातील बैठकीआधी हे दोन्ही नेते रयत सिक्षण संस्थेच्या बैठकीवेळी एकत्र आले होते. विशेष म्हणजे त्या बैठकीत दोन्ही नेते एकमेकांच्या शेजारी बसले होते. काही दिवसांपूर्वी वसंतदाद शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक पार पडली. त्या बैठकवेळी अजितदादा शरद पवार यांच्या भेटीसाठी केबीनमध्ये दाखल झाले होते. जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे दोन्ही नेते एकत्र आले होते. त्यावेळी अजितदादा स्वत: शरद पवार यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर गेरले होते.
सर्वच कुटुंबांनी एकत्र यावं- सुप्रिया सुळे
याच भेटसत्रांवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. साखरपुड्याचा कार्यक्रम असेल तर कुटुंब म्हणून सगळे एकत्र येतात. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यात फार काही चर्चा करण्याचं कारण नाही. कारण पवार कुटुंबाचा हा अंतर्गत प्रश्न आहे. शरद पवार ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्या संस्थेत मी सदस्य म्हणून काम करतो. अशा वेळी एकत्र बसावं लागतं. काही विषय असतात की ते राजकारणाच्या पलिकडे पाहायचे असतात, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलेले आहे.
दरम्यान, आमच्या या भेटीतून कोणताही राजकीय अर्थ काढू नका, असे अजित पवार म्हटले असे तरी दुसरीकडे राज्यातील सर्वच कुटुंबांनी एकत्र यायला हवं, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.