दिल्ली, मुंबईतील घर ईडीने का ताब्यात घेतलं त्यावर पुस्तक काढा; शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना डिवचले
मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होतो. कुणाला तरी सांगून मी राजीनामा देतो असं म्हणण्याचं कारण नव्हतं. सामूहिक निर्णय झाला होता. सामूहिक निर्णयासोबत आम्हाला जायचं होतं. राजीनामा देण्याचा प्रश्नच नव्हता. आमच्यात वेगवेगळ्या गोष्टींच्या चर्चा होत होत्या. पण कुणाला तरी सांगू राजीनामा देतो अशी स्थिती नव्हती, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं. शरद पवार हे पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुणे | 2 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आपल्याला अनेक गोष्टी माहीत आहेत. त्यावर पुस्तक लिहावं लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना दिला होता. यावरून शरद पवार यांनी पटेल यांना चांगलंच घेरलं आहे. त्यांच्या पुस्तकाची मी वाट बघतोय. त्यांनी पुस्तक लिहावं. लोक पक्ष सोडून का जातात यावर त्यांनी चॅप्टर लिहावा. त्यांच्या घरी ईडीची धाड का पडली? यावर त्यांनी एखादा चॅप्टर लिहावा. दिल्ली किंवा मुंबईचे घर आहे त्यातील किती मजले ईडीने ताब्यात घेतले आणि का घेतले तेही लिहावं. त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडेल, असा टोला लगावत शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना घेरलं.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. 2004मध्येच आम्ही भाजपसोबत जाणार होतो, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला. त्यालाही शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. 2004 साली जाणार होतो. हे अशक्य असं मी म्हणणार नाही. आम्ही म्हणजे ते. मी नव्हे. पटेल माझ्या घरी येऊन काही तास थांबले. भाजपसोबत गेलं पाहिजे, वाजपेयींसोबत गेलं पाहिजे असा आग्रही विचार त्यांनी माझ्यासमोर मांडला. अनेकवेळा ते तास न् तास सांगत होते. पण ती गोष्ट स्वीकारणे मला शक्य नाही. तुम्ही भाजपसोबत जाऊ शकता. माझा गैरसमज होणार नाही, असा सल्ला मी त्यांना दिला. पण माझा नकार बघून ते थांबले. त्यानंतर निवडणूक झाली. त्यांचा पराभव झाला. पक्षाने त्यांना केंद्रात मंत्री केलं. पराभूत उमेदवारालाही पक्षाने केंद्रीय मंत्रीपद दिलं ही वस्तुस्थिती लक्षात ठेवा, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
अजित पवार यांनी बारामतीतून उमेदवार देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. संसदीय लोकशाहीत कोणताही पक्ष आपला कार्यक्रम घेऊन कोणत्याही मतदारसंघात जाऊ शकतो. बारामती असो की अन्य मतदारसंघ असो. तिथे अन्य पक्षाचे लोक तिथे जाऊन भूमिका मांडू शकतात. त्यासाठी त्यांनी निवडणूक लढवली तर त्यात तक्रार करण्याचं कारण नाही, असं पवार म्हणाले.
कुणाच्या परवानगीची गरज नाही
एका उद्योगपतीच्या घरी शरद पवार आणि माझी भेट झाली होती, असं अजितदादा म्हणाले होते. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. महाराष्ट्रात मी कुणाच्या घरी जावं आणि जावू नये यासाठी मला कुणाची परवानगी घ्यायची गरज नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी राष्ट्रवादीच्या नावाने अर्ज भरला, निवडणूक लढवली, राष्ट्रवादीच्या नावाने मतं मागितली आणि नंतर विसंगत भूमिका घेतली तर लोकांना पटत नाही. लोकशाहीत अशा गोष्टी योग्य नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.