Eknath Shinde: तर उद्धव ठाकरेंसोबत असणाऱ्या 16 आमदारांना आमचंच ऐकावं लागेल, दीपक केसरकरांनी मांडली कायदेशीर बाजू
Eknath Shinde : शेवटची मुदत दिल्यानंतर आम्ही पुढचे निर्णय घेतले. तुम्ही जेव्हा एखाद्या मोठ्या पक्षाला शब्द देतात. त्या शब्दावरुन माघार घेता येत नाही. आम्ही एकनाथ शिंदे यांना सांगितलं की, हा शेवटचा दिवस आहे.
पणजी: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा देताना उद्धव ठाकरेंनी अत्यंत भावनिक भाषण केलं. बंडखोरांना फटकारेही लगावले. त्यानंतर आज शिंदे गटाकडून सविस्तर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. शिंदे गटाचे (Eknath Shinde) आमदार दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी मीडियाशी संवाद साधताना मीडियाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदर आहे. त्यामुळेच आम्ही त्यांचा राजीनामा मागायला गेलो नाही. आम्हाला त्यांचा राजीनामा नको होता. तर भाजपसोबतची नैसर्गिक युती हवी होती, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं. तसेच ज्या 16 आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार नाही. ते आमदार आमच्यासोबतच राहतील. उलट शिवसेनेच्या आमदारांनाच आमचं ऐकावं लागेल, असा दावा दीपक केसरकर यांनी केला.
आम्ही आमच्या पक्षाची नोंदणी विधानभवनात केली आहे. त्यामुळे आमचा गट हा विधीमंडळात शिवसेना म्हणूनच राहणार आहे. आम्ही शिवसेनेवर दावा केला नाही. कोणत्याही पक्षावर दावा करण्यासाठी निवडणूक आयोगाची प्रक्रिया असते. त्यामुळे बाहेर आम्ही शिवसेनेवर दावा केला नाही. पण सभागृहात आमचा गट शिवसेना म्हणून असेल. बहुसंख्य आमदार जेव्हा आपला नेता निवडतात. तेव्हा त्यांच्यासोबत राहावं लागतं. 16 आमदार आपला नेता बदलू शकत नाहीत. पक्षांतर बंदी कायदा हा सभागृहात लागू होतो. तुम्ही कशी कामगिरी करतात, व्हीप पाळला गेला नाही, नियम सभागृहात मोडले, तरच कारवाई होते, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.
शब्द फिरवता येत नाही
शेवटची मुदत दिल्यानंतर आम्ही पुढचे निर्णय घेतले. तुम्ही जेव्हा एखाद्या मोठ्या पक्षाला शब्द देतात. त्या शब्दावरुन माघार घेता येत नाही. आम्ही एकनाथ शिंदे यांना सांगितलं की, हा शेवटचा दिवस आहे. तुम्ही शब्द द्या. मग आता माघार नाही. हा वाद तत्त्वांचा वाद आहे. आताची युती बरोबर नाही. राज्याच्या जनतेनं ज्यांना निवडून दिलं, त्यांच्याशीच युती झालेली आहे. तुम्ही स्वतः शिवसेनेत आणि निम्मं काम राष्ट्रवादीचं करता, तेव्हा तुम्ही जनतेच्या पाठीत खंजीर खुपसता. निवडून देणारी जनता असते, पक्ष नसतो, असंही त्यांनी सांगितलं.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात बंडखोरी
कार्यकर्त्यांना चुकीचं वागण्यापासून रोखलं पाहिजे. ती माणसं आपल्यापासून दूर जाऊ शकतात. हे थांबवलं पाहिजे. अनेकांचे फोन येतात. त्यांना मला सांगायचंय, की शिवसेनेत ठाकरे कुटुंबाला आमचा विरोध नाही. कुणीही उद्धव साहेबांच्या विरोधात गेलं नाही. त्याच्याविरोधात बंडखोरी केली, असं काही झालेलं नाही. आम्ही राष्ट्रवादी, काँग्रेस विरोधात बंड केलंय, असा दावा त्यांनी केला.
आघाडीची साथ सोडा
हा वैधानिक पक्ष आहे. विधीमंडळ पक्षाला मान्यता आहे. 15 लोकांच्या सह्यांनी शिंदे साहेबांना काढण्याचा प्रयत्न झाला. नार्वेकरांना, फाटक साहेबांना चर्चेला पाठवणार, असं म्हणता मग तुम्ही त्यांच्यावर कारवाई का केली? मी या गटाच्या वतीने बोलतोय. अगदी दोन दिवसआधी उद्धव साहेबांना खुलं पत्र लिहिलं होतं. अजूनही तुम्ही महाविकास आघाडीची साथ सोडा. आम्ही सर्व तुमच्याशी बोलायला येतो. पण ती अजूनही सोडलेली नाही. तुम्ही राजीनामा दिला, पण काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडलं नाही, असंही ते म्हणाले.