Eknath Shinde : शेतकऱ्यांना मदत मिळण्यास विलंब; शिंदे गटाचे खासदार नाराज?, तातडीने मदत करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट तीन हेक्टरपर्यंत मदत देण्यात यावी अशी मागणी शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने (Kripal Tumane) यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
नागपूर : जून, जैल महिन्यात राज्याच्या अनेक भागात पावसाने थैमान घातले. अतिवृष्टीचा (heavy rain) मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. नदी, नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी शेतात घुसल्यामुळे पिके पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. यातून सावरत असताना पुन्हा एकदा ऑगस्टमध्ये शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे. मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. काही जिल्ह्यात मदत मिळाली ती मदत झालेल्या नुकसानाच्या तुलनेत अतिशय तोकडी असल्याचा सूर शेतकऱ्यांमधून उमटत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट तीन हेक्टरपर्यंत मदत देण्यात यावी अशी मागणी शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने (Kripal Tumane) यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तसेच याबाबत कृपाल तुमाने हे लवकरच मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार आहेत.
शिंदे गटाचे खासदार नाराज?
दरम्यान दुसरीकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास उशीर होत असल्याने शिंदे गटाचे खासदार नारज असल्याची बातमी देखील समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास उशीर होत आहे. नुकसानाचे पंचनामे पूर्ण होण्यास वेळ लागेल. पंचनामे पूर्ण होईपर्यंत मदत मिळणार नाही. अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट तीन हेक्टरपर्यंत मदत द्यावी अशी मागणी शिंदे गटाचे खासदार तुमाने यांनी केली आहे. याबाबत ते लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेणार आहेत.
कृषीमंत्री विदर्भाच्या दौऱ्यावर
कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. विदर्भात आलेल्या पुराचा मोठा फटका हा चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली जिल्ह्याला बसला आहे. अब्दुल सत्तार हे सध्या विदर्भातील नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेत आहेत. अब्दुल सत्तार कृषीमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदर्भ दौरा आहे. दुसरीकडे पुन्हा एकदा हवामान विभागाकडून विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने प्रशानाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.