मुश्रीफ म्हणाले, मला चंद्रकात पाटलांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली, आता फडणवीसांचा पलटवार
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुश्रीफांच्या गौप्यस्फोटावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कुणी ऑफर दिली मुश्रीफांसाहेबांना? असे ऑफर लेटर घेऊन आम्ही फिरत थोडी असतो, असं म्हणत मुश्रीफांचा दावा खोडून काढण्याचा फडणवीसांनी प्रयत्न केला.

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती, असा मोठा आणि खळबळजनक गौप्यस्फोट महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. त्यावर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुश्रीफांच्या गौप्यस्फोटावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कुणी ऑफर दिली मुश्रीफांसाहेबांना? असे ऑफर लेटर घेऊन आम्ही फिरत थोडी असतो, असं म्हणत मुश्रीफांचा दावा खोडून काढण्याचा फडणवीसांनी प्रयत्न केला.
चंद्रकांत पाटील यांनी मला भाजपत येण्याची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट मुश्रीफांनी केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्याच्याही पुढे जाऊन मी भाजपची ऑफर नाकारली म्हणून मला त्रास देण्यासाठी माझ्यावर ईडीच्या धाडी वगैरे टाकल्या, असं मुश्रीफ यांनी सांगितलं. या सगळ्या प्रकारावर देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांनी मुश्रीफांवर पलटवार केला आहे.
कुणालाही देण्याकरिता आमचे ऑफर मैदानात पडलेले नाहीत, फडणवीसांचा पलटवार
हसन मुश्रीफ साहेबांना भाजपमध्ये येण्याची कुणी ऑफर दिली, असा सवाल करताना असे ऑफर लेटर घेऊन आम्ही थोडी फिरत असतो, असे आमचे ऑफर लेटर मैदानात पडलेले नाहीत, कुणालीही देण्याकरिता, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.
घोटाळ्याच्या आरोपावरुन लक्ष हटविण्यासाठी मुश्रीफांची दिशाभूल
मुश्रीफ आता काहीतरी बोलतायत. घोटाळ्याच्या आरोपावरुन लक्ष हटविण्यासाठी त्यांनी आता बाजपची ऑफर होती, असं सांगितलं आहे. त्यांनी अशी कोणतीही कुणीही ऑफर दिलेली नाही, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले.
हसन मुश्रीफ यांचा नेमका गौप्यस्फोट काय?
चंद्रकांत पाटील हे भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात भाजप भुईसपाट झाला, हे भुईसपाट कुणामुळे झालं, तर मुश्रीफांमुळे, त्यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पण मी त्यांना ठणकावून सांगितलं, पवार एके पवार. त्यांनी माझ्यावर इन्कम टॅक्सची धाड टाकली, आता महाविकास आघाडी प्रबळ झाली आहे. त्यांच्यासमोर भाजपला यश मिळत नाही, त्यामुळे हे सगळं सुरु आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
(Devendra fadanvis Comemnt on hasan Mushriff Claim BJP Offer)
हे ही वाचा :
Kirit Somaiya vs Hasan Mushrif Live : शिवसेना आमचं फेव्हिकालचं नातं, दिवार तुटणार नाही- हसन मुश्रीफ