Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल, काहीच वेळात ठरणार महाराष्ट्राच्या नव्या सरकारच्या सत्तास्थापनेचा मुहूर्त
भाजपच्या गोटातील हालचालींना प्रचंड वेग आला असून दिल्लीत भाजप नेतृत्वही महाराष्ट्रातील सत्तापेचावर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. दिल्ली भाजपच्या मार्गदर्शनातूनच देवेंद्र फडणवीस येत्या काही दिवसात म्हणजेच रविवार ते सोमवारी सत्ता स्थापनेसाठी दावा करून नवं सरकार स्थापन करेल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
मुंबईः मी पुन्हा येणार.. .असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न साकारण्याची वेळ आलीय, अशी शक्यता सध्याच्या राजकील हालचालींवरून दिसून येतेय. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले आहेत. दिल्लीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतील. महाराष्ट्रात भाजपकडून सत्ता स्थापनेसाठीचा दावा कधी करण्यात येईल, या प्रमुख मुद्दयावर या भेटीत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. काल एकिकडे सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने कौल दिला असताना शिंदे गटातील आमदारांवरची अपात्रतेची कारवाई तूर्तास टळली आहे. त्यामुळे शिंदे गटासमोरील आव्हाने कमी झाली आहेत. तर एकडे भाजपच्या गटातील हालचालीही वाढल्या आहेत. शिंदेंच्या बंडखोरीमागे आमची काहीही भूमिका नसलेले भाजप कालपासून आत्मविश्वासाने वावरत आहे. एकिकडे सुप्रीम कोर्टाचा निकाल लागत होता, तसा देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या गोटातील नेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक काल सागर बंगल्यावर झाली. त्यात महाराष्ट्रातील नवीन सरकार स्थापनेसाठी काय रणनीती आखायची यावर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय..
भाजपचे दोन प्लॅन तयार
महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या शिवसेना आणि अपक्षा असे 50 आमदार घेऊन शिंदे गट बाहेर पडलाय. या गटाने पाठिंबा काढल्यास कधीही सरकार कोसळेल अशी स्थिती आहे. मात्र एकनाथ शिंदे गट अजूनही उद्धव ठाकरे सरकारला भाजपाशी युती करण्याची कळकळीची विनंती करत आहे. गुवाहटीतील आमदारांनी महाराष्ट्रात येऊन महाविकास आघाडीचा पाठिंबा काढला तरी भाजप सत्तास्थापनेसाठी दावा करू शकते. मात्र गुवाहटीतील आमदार महाराष्ट्रात आले नाही तरीदेखील भाजप सत्तास्थापनेसाठी दावा करेल, त्यानंतर शिवसेनेवर नाराज असलेल्या गुवाहटीतील आमदारांना फ्लोअर टेस्टसाठी महाराष्ट्रात यावे लागेल. त्यामुळे दोन्हीही प्रकारे भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार बनण्यासाठी भाजपा नेत्यांची पूर्ण तयारी झाली आहे. त्यामुळे भाजपसाठी नवं सरकार बनवण्याचा मुहूर्त जवळ आल्याचे बोलले जात आहे.
रविवार-सोमवारचा मुहूर्त?
गुवाहटीतील शिंदे आमदारांचा गट महाराष्ट्रात कधी येईल, हे अद्याप निश्चित नाही. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटामध्ये एकमेकांसमोर वेगवेगळे पर्याय ठेवणे आणि विनवण्या, भावनिक आवाहन करण्याचे सत्र सुरु आहे. या सगळ्या गदारोळात भाजपच्या गोटातील हालचालींना प्रचंड वेग आला असून दिल्लीत भाजप नेतृत्वही महाराष्ट्रातील सत्तापेचावर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. दिल्ली भाजपच्या मार्गदर्शनातूनच देवेंद्र फडणवीस येत्या काही दिवसात म्हणजेच रविवार ते सोमवारी सत्ता स्थापनेसाठी दावा करून नवं सरकार स्थापन करेल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.