मुंबई महापालिकेवर आपलाच भगवा फडकेल; राज ठाकरे यांच्या समोरच देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?
राज ठाकरे यांच्यासमोरच देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेवर आपला भगवा फडकवू असं विधान केलं. पुढच्या वर्षी दिवाळी साजरी करताना मुंबई महापालिकेतही आपली सत्ता असेल असं म्हटलं.
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी काल शिवाजी पार्क मैदानावर दीपोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) उपस्थित होते. यावेळी मनसेचे शेकडो कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेवर आपलाच भगवा फडकेल असं विधान केलं. तसेच मतदारांची मने जिंकण्याचं आवाहनही केलं. मंचावर राज ठाकरे उपस्थित असताना आणि समोर मनसे सैनिक असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी हे आवाहन केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मनसे, भाजप आणि शिंदे गट यांची महापालिकेत युती होणार असल्याचं फिक्स झालंय का? अशी चर्चा या निमित्ताने होत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेच्या दीपोत्सवाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी राजकीय भाष्य केल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. पुढच्या वर्षीचा आपण दीपावलीचा उत्सव करत असू त्यावेळी महाराष्ट्र सरकारसोबत मुंबईचंही सरकार आपलंच असेल. आपण हाच संकल्प करू या. जनतेची मनं जिंकू या. जनतेची मनं जिंकली की मतं जिंकता येतात. निश्चितपणे आपला भगवा महापालिकेवर फडकवून दाखवू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दिवाळी हा आपला अतिशय महत्त्वाचा सण आहे. आपण या दिव्यांच्या माध्यमातून आपल्यातील तेज जागृत करत असतो. म्हणून दीपोत्सव महत्त्वाचा उत्सव आहे. संपूर्ण परिसरात लक्ष लक्ष दिवे पेटले आहेत. त्यामुळे लख्ख प्रकाश पाहायला मिळतो. तसाच लख्ख प्रकाश तुमच्या आयुष्यात यावा ही अपेक्षा व्यक्त करतो, अशी कामनाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.
दरम्यान, राज ठाकरे यांच्यासमोरच देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेवर आपला भगवा फडकवू असं विधान केलं. पुढच्या वर्षी दिवाळी साजरी करताना मुंबई महापालिकेतही आपली सत्ता असेल असं म्हटलं. त्यामुळे फडणवीस यांना काय संकेत द्यायचे आहेत? महापालिकेत मनसे, भाजप आणि शिंदे गटाची सत्ता येणार असं फडणवीस यांना सूचवायचं आहे का? महापालिकेत मनसे, भाजप आणि शिंदे गटाची युती होणार असल्याचे संकेत तर फडणवीस यांना मनसे सैनिकांना द्यायचे नाहीत ना? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.
तर, दुसरीकडे राज ठाकरे यांनी मात्र, यावेळी कोणतंही राजकीय भाष्य केलं नाही. त्यांनी लोकांनी दिवाळीचा आनंद घेण्याचं आवाहन करतानाच जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र, राज ठाकरे यांना कधीही भेटण्यास येण्याचं आवाहन केलं. तुम्ही रात्री-अपरात्री भेटायला आला तरी आम्ही तुम्हाला भेटू, असं शिंदे म्हणाले. मनसेच्या दीपोत्सवाला यापूर्वीच यायचं होतं. मनात इच्छा असूनही येता आलं नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.