राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट, मुंबई मनपा निवडणुकीत नवं समीकरण? राजकीय चर्चांना उधाण
हिंदुत्वाच्या अजेंड्यावर राज ठाकरे आणि भाजप एकत्र येण्याची शक्यता अनेकदा गृहित धरली जाते. मनसेनं गेल्या काही महिन्यात हिंदुत्वासाठी घेतलेली आग्रही भूमिका पाहता भाजप आणि मनसे एका प्लॅटफॉर्मवर आल्यास वावगं समजलं जाणार नाही.
मुंबईः महाराष्ट्राच्या राजकारणात नव्यानं चर्चा घडवणारी एक महत्त्वाची घडामोड नुकतीच घडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. फडणवीस यांचे शासकीय निवास स्थान सागर बंगल्यावर राज ठाकरे (Raj Thackeray) गेले होते. या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये जवळपास एक तासभर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय. आगामी महापालिका (Mumbai Municipal Election) आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीमागे काय राजकीय गणितं आहेत, याचे तर्क लावले जात आहेत. हिंदुत्वाच्या अजेंड्यावर राज ठाकरे आणि भाजप एकत्र येण्याची शक्यता अनेकदा गृहित धरली जाते. मनसेनं गेल्या काही महिन्यात हिंदुत्वासाठी घेतलेली आग्रही भूमिका पाहता भाजप आणि मनसे एका प्लॅटफॉर्मवर आल्यास वावगं समजलं जाणार नाही. सध्या तरी या भेटीमागचं नेमकं कारण पुढे आलेलं नसलं तरीही राजकीय वर्तुळात पुढील समीकरणांविषयी चर्चा सुरु झाली आहे.
भेटीमागचं कारण हे असू शकतं?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट झाली. या भेटीत राजकीय चर्चा होणं अपेक्षितच आहे. मात्र यामागे आणखी एक कारण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे यांच्या नव्या शीवतीर्थ या घरी पहिल्यांदाच गणपतीचं आगमन होत आहे. त्यामुळे गणरायाच्या दर्शनाला यावं, असं आमंत्रणही राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे.
भाजप नेत्यांची भूमिका काय ?
मनसेने भाजपसोबत निवडणुकीत एकत्र यावे, अशी भाजपच्या नेत्यांचीही भूमिका असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकांमध्येही मनसेला सोबत घेण्याविषयी चर्चा झाली आहे. मराठी मतदारांना सोबत घेण्यासाठी मनसेला सोबत घेणं भाजपला लाभदायक ठरू शकतं, असं मत नेत्यांनी व्यक्त केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचीदेखील अशीच भूमिका आहे, असं समजतंय..
5 सप्टेंबरला अमित शहा मुंबईत
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांचा मुंबई दौरा आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शहांचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. महापालिकेत इतर पक्षांसोबत भाजपची काय स्ट्रॅटजी असेल, त्यावर या दौऱ्यात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. हा दौरा गणेशोत्सवाच्या काळातच होणार असल्याने, राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना गणेशाच्या दर्शनासाठी आमंत्रण देणं, यामागे अनेक महत्त्वाचे राजकीय अर्थ असू शकतात, हे लक्षात घ्यावं लागेल.