मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज खूप मोठे दावे केले आहेत. पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना एका डिझायनर महिलेकडून फसवणूक आणि ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा फडणवीसांनी केला. “पैशांनी भरलेली बॅग माझ्या घरात काम करणाऱ्या महिलेला दिली. याचा व्हिडीओ तयार करुन ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला”, अशी धक्कादायक माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हा एक राजकीय कट आहे का ते मी पुरावे सिद्ध झाल्याशिवाय बोलणार नाही. जोपर्यंत पुरावा हाती येत नाही तोपर्यंत बोलणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
यात काही नेते, अधिकारी यांची नावे आहेत. विशेष म्हणजे यात मुंबईच्या एका माजी पोलीस आयुक्तांचं नाव असल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला. याचे सगळे पुरावे मी माध्यमांसमोर ठेवेल. पण सध्या या संदर्भात तपास सुरु आहे. माझ्या पद्धतीने कशा पद्धतीने फसवण्याचा आणि ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
“मी विधानसभेत निवेदन दिलं आहे. माझी पत्नी अमृता फडणवीस यांनी एक एफआयआर दाखल केलं आहे ज्यामध्ये त्यांच्यामाध्यमातून भ्रष्टाचार आणि ब्लॅकमेल करुन दबाव तयार करुन आपले केसेस मागे घ्यायचे, भ्रष्टाचार करायचे प्रयत्न केले गेले. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे”, अशी देखील माहिती फडणवीसांनी दिली.
“अनिल जयसिंघानी हे एक बुकी आहेत जे गेल्या चार ते पाच वर्षांपासून अॅबस्कॉन्डिंग आहेत. देशातील विभिन्न राज्यांमध्ये त्यांच्याविरोधात 14 केसेस दाखल आहेत. त्यांची मुलगी अनिक्षा जयसिंघानी जी सुशिक्षित आहे, त्यांनी आधी 2015-16 मध्ये माझ्या पत्नीसोबत संपर्क केलेला. त्यानंतर कोणताही संपर्क केला नाही”, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
“महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर अनिक्षा 2021 मध्ये पुन्हा माझ्या पत्नीच्या संपर्कात आली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, मी ड्रेस डिझायनर आहे, तुम्ही माझे ड्रेस वापरुन बघा. मी आर्टिफिशअल ज्वेलरीचं काम करते. त्यांनी हळूहळू माझ्या पत्नीचा विश्वास संपादीत करण्याचा प्रयत्न केला. माझ्या आईचं निधन झालंय. तिच्यावर पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकाचं तुम्ही विश्लेषण करा, मी 50 प्रमुख महिलांमध्ये आली, माझं स्वागत करा, अशा अनेक गोष्टी सांगून ती खूप जवळ आली आणि एकदा तिने सांगण्याची गोष्ट केली की, माझे वडील पोलिसांना माहिती देत होते. बुकींना पकडून द्यायचे. त्याबदल्यात पैसे मिळायचे. तुम्ही मला या कामात मदत करा, असं तिने पत्नीला सांगितलं”, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
“माझ्या पत्नीने तिला स्पष्ट नकार दिला. तेव्हा तिने सांगितलं की, माझ्या पित्याला चुकीच्या गुन्ह्यांतर्गत फसवलं गेलंय. तेव्हा माध्या पत्नींनी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यास सांगितलं. आम्हाला ती चुकीचं काम करत असल्याचं लक्षात आलं. दरम्यान ती बोलून गेली की, मी माझ्या पित्याला सोडवण्यासाठी एक कोटी रुपये देऊ. त्यानंतर माझ्या पत्नीने तिला मोबाईलवर ब्लॉक केलं. त्यानंतर तिने दुसऱ्या फोननंबरवरुन काही मेसेज आणि व्हिडीओ समोर आले”, असं फडणवीसांनी सांगितलं.
“त्यामध्ये अनिल सिंघानीया यांनी काही मागण्या केल्या होत्या. नाहीतर संबंधित व्हिडीओ आम्ही सार्वजनिक करु अशी धमकी दिली होती. त्या व्हिडीओमध्ये नेमकं काय होतं तर ती माझ्या पत्नीला अंगठी घालत आहे, हार घालत आहे. हे सगळं ठिक आहे. पण दोन व्हिडीओ असे तयार केले आहेत की एका व्हिडीओत ती बाहेर कुठेतरी एका बॅगेत पैसे भरत आहे आणि तशाचप्रकारची बॅग ती माझ्या घरात काम करणाऱ्या महिलेला देत आहे. त्यानंतर तिने सांगितलं की मी पैसे दिले. हे सगळे व्हिडीओ आल्यानंतर आम्ही एफआयआर दाखल केले आणि फॉरेन्ससाठी तपासासाठी पाठवलं. त्याचे रिपोर्ट समोर आले. आम्ही अनिल सिंघानीया यांना अँगेज करत होतो. त्यातून काही नेते आणि अधिकाऱ्यांचं नाव समोर आले आहेत”, अशी माहिती त्यांनी दिली.
“याची सुरुवात मविआ सरकार काळात आपले केस मागे घेण्यासाठी करण्यात आली होती. पण ब्लॅकमेल केल्यानंतर आपण केसेस मागे घेऊ शकतो, अशी माहिती समोर आली. संबंधित व्यक्ती वीपीएनहून बात करायचा. संबंधित व्यक्तीवर कारवाई झालीय. पण तो अजून सापडलेला नाही. त्याचा शोध सुरु आहे. अतिशय खालच्या दर्जाचं राजकारण आहे. मी कुणावरही आरोप करणार नाही. कारण पुरावे मिळालेली नाहीत. संबंधित व्यक्तीने अशा लोकांची नावे घेतली आहेत, पण ते कितपत सत्य आहे याची शाहनिशा केली जाईल. मी चौकशी केली तेव्हा मविआ सरकार काळात या व्यक्ती विरोधातील केसेस मागे घेण्यासाठी कार्यवाही सुरु झाल्याची माहिती समोर आली. यामध्ये मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांचं देखील नाव समोर आलं आहे”, असा दावा त्यांनी केला.