Devendra Fadnavis Birthday : ‘मी पुन्हा येईनची चेष्टा केली, पण ते पुन्हा आलेत’, चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना टोला, वाढदिवशी फडणवीसांचं तोंडभरुन कौतुक
कमी वयात नगरसेवक, महापौर, आमदार आणि मुख्यमंत्री झाले. राज्यातील जनतेच्या मनात उत्सुकता आहे की कोण हा तरुण, त्यामुळे हे 'मनोगत' असल्याचं पाटील म्हणाले.
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा वाढदिवस आज मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाजपकडून जाहिरातबाजी (Advertise) किंवा फ्लेक्सबाजी करण्यात आली नाही तर आरोग्य शिबिरावर भर दिला, असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितलं. भाजपचं पाक्षिक असलेलं ‘मनोगत’च्या च्या विशेषांकाचं प्रकाशन आज करण्यात आलं. त्यावेळी पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांचं तोंडभरुन कौतुक केलं. मनोगतच्या या अंकात फडणवीसांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू समोर येतील. कमी वयात नगरसेवक, महापौर, आमदार आणि मुख्यमंत्री झाले. राज्यातील जनतेच्या मनात उत्सुकता आहे की कोण हा तरुण, त्यामुळे हे ‘मनोगत’ असल्याचं पाटील म्हणाले.
देवेंद्र फडणवीस हे यशस्वी मुख्यमंत्री ठरले. 2019 च्या महापुरात त्यांनी जनतेची खूप मदत केली. रस्ते, सिंचन, उद्योग, मेट्रो अशा विविध मार्गाने त्यांनी राज्याचा विकास केला. युती सरकारचा कार्यकाळ संपताना ते मी पुन्हा येईन म्हणाले होते. त्याची चेष्टा केली गेली, पण ते पुन्हा आले, असं सांगत पाटील यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना जोरदार टोला लगावलाय.
राज्याचे उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश भाजपाकडून मनोगतच्या विशेषांकाचं प्रकाशन कार्यालयात केलं. या वेळी राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिव प्रकाशजींसह मान्यवर उपस्थित होते. या वेळी शिव प्रकाशजी यांचाही विशेष सत्कार केला. pic.twitter.com/DnN2HNJNe0
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 22, 2022
‘वास्तविकतेचं भान ठेवून निवडणुका व्हाव्यात’
पाटील यांनी ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदनही केलं. वास्तविकतेचं भान ठेवून निवडणुका व्हाव्यात, असं मी निवडणूक आयोगाला सांगतोय. घाई घाईने निर्णय न होता अंतर्भूत पद्धतीनं निवडणुका व्हाव्यात यासाठी आम्ही पत्र देणार आहोत. पावसाचा विचार करुन निवडणूक आयोगाने निवडणुकांचा विचार करावा, असं पाटील म्हणाले.
‘सर्व आमदार आणि खासदारांचे आभार’
एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर पाटील यांनी सर्व आमदार आणि खासदारांचे आभार मानले. पाटील म्हणाले की, सर्वसामान्य लोकांनाही काल आनंद झाला. आम्हाला 181 मतं पडली. मला वाटतं एक मत जास्त पडलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 98 मतं पडली, त्यांचं एक मत कमी झालं.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काय म्हणाले पाटील?
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मी टिप्पणी करणार नाही. 2014 ला आम्ही सुरुवातीला 7 मंत्री होतो. 2019 ला फक्त 6 मंत्री होतो. त्यांनी तीन महिने मंत्री केले नाही. तेलंगणातही मंत्रिमंडळ विस्ताराला असाच विलंब झाला होता, अशी आठवणही पाटील यांनी यावेळी करुन दिली.