छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक की धर्मवीर ? देवेंद्र फडणवीस यांनी केला नावात असा बदल
डिसेंबरमध्ये नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक होते असे विधान करून एकच खळबळ उडवून दिली.
मुंबई : तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुणे जिल्ह्यातील बलीदान स्थळ तुळापूर आणि वढू (बु.) शिरूर येथील समाधी स्थळ विकास आराखड्यास मान्यता दिली होती. परंतु, जूनमध्ये राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. आणि ठाकरेंशी सरकार कोसळले. तर, डिसेंबरमध्ये नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक होते असे विधान करून एकच खळबळ उडवून दिली. अजित पवार यांच्या या वक्तव्यांचे राज्यभर पडसाद उमटले होते. भाजप, शिवसेना ( शिंदे गट ) आणि मनसेने त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलने सुरु केली. पण, अजित पवार आपल्या वक्तव्यावर ठाम होते.
अजित पवार यांच्या वक्तव्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने समर्थन केले होते. खासदार अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावत त्यांची बाजू उचलून धरली होती. तर, भाजप, शिवसेनेने अमोल कोल्हे यांच्या स्वराज्य रक्षक या मालिकेचे उदात्तीकरण करण्यासाठीच ही नवी खेळी खेळल्याच्या आरोप केला होता.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी महाराज यांनी खऱ्या अर्थाने धर्माचे रक्षण केले होते. राष्ट्रधर्म, स्वधर्म आणि हिंदू धर्म तिन्हीचे रक्षण केले. हिंदू धर्माचा त्याग करा असे औरंगजेबाने सांगूनही त्यांनी आपला धर्म सोडला नाही. त्यांनी आपले बलिदान दिले. त्यामुळे ते खरे धर्मवीर आहेत असा युक्तिवाद केला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या वादात उडी घेत देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन केले होते. त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी स्वराज्यरक्षक संभाजीराजे यांच्या नावाने बालशौर्य पुरस्कार देण्याची घोषणा आपण अर्थसंकल्पातून केली. त्या अर्थसंकल्पाला कॅबिनेटने मान्यता दिली. त्या कॅबिनेटमध्ये आपणही होतात. त्यावेळी तुम्हाला हे आठवले नाही का ? असा सवाल केला होता.
यानंतरही संभाजीराजे स्वराज्य रक्षक की धर्मवीर असा वाद सुरूच राहिला होता. मात्र, या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपाय शोधला आहे. नियोजन विभागाने २८ जून २०२२ ला शासन निर्णय घेत स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील तुळापूर येथील बलिदान स्थळ आणि शिरूर येथील वढू (बु.) येथील समाधी स्थळ स्मारक येथील विकास आराखड्यास मान्यता दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी या विकास आराखड्याच्या नावामध्ये अंशतः बदल केला आहे. विकास आराखड्याला ‘स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर, तालुका हवेली व समाधी स्थळ स्मारक वढू (बु.), शिरूर, जि.पुणे विकास आराखडा असे नाव देत फडणवीस यांनी या वादावरच पडदा टाकला आहे.