‘मला पूर्ण कल्पना, आता इंडिया आघाडीची बैठक होईल, आणि…’, देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा
उपमुख्यमंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ राज्याच्या निवडणूक निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांना चिमटे काढले आहेत. या विजयानंतर आता पुन्हा एकदा ईव्हीएमला खापर फोडले जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
नागपूर | 3 डिसेंबर 2023 : देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळताना दिसत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन जिल्ह्यांमध्ये भाजपला यश मिळताना दिसत आहे. तर तेलंगणा राज्यात काँग्रेसला यश मिळताना दिसत आहे. चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “चार राज्यांच्या निकालांमध्ये तीन राज्यांमध्ये भाजपला अभूतपूर्व असं यश प्राप्त झालंय. हे यश जनतेच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास, या विश्वासाचं हे यश आहे. मोदींनी ज्याप्रकारे पारदर्शी आणि प्रामाणिकपणे गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला, ज्याप्रकारे मोदींनी देशाला विकासाच्या मार्गावर नेलं, सामान्य माणसाच्या मनामध्ये सरकार त्यांच्याकरता आहे हे बिंबवलं, त्याचं प्रत्यंतर लोकांना ज्याप्रमाणे पाहायला मिळालं हा त्याचा विजय आहे, म्हणून या राज्यांमधील जनेतेच आभार मी मानतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“या राज्यांमधील विजयाचं श्रेय नरेंद्र मोदी यांचं आहे. त्यांच्या नावाचं, करिष्माचं आहे, त्याचसोबत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि आमचे स्ट्रॅटेजीस्ट अमित शाह, तसेच त्या त्या राज्यातील भाजपची टीम आणि भाजपची राष्ट्रीय टीम यांचं हे यश आहे. मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो”, असं देवेंद्र फडणीस म्हणाले.
‘भाजपची मते ही 10 टक्के पेक्षा जास्त वाढली’
“भाजपची मते ही 10 टक्के पेक्षा जास्त वाढली आहे. छत्तीसगडमध्ये जवळपास 14 टक्क्याने वाढली आहे. भाजप मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये वाढली आहेत. तेलंगणातही जवळपास 10 टक्क्यांनी मते वाढली आहेत. त्यामुळे जनतेचा मोठा विश्वास बघायला मिळतोय. आताचे कल बघितले तर 639 पैकी 339 जागा भाजप पक्ष जिंकतेय, याचाच अर्थ 50 टक्क्यांपेक्षा जास्त जागा भाजप जिंकतेय”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“हा निकाल अभूतपूर्व असा आहे. हा निकाल जनतेच्या मनामध्ये काय आहे, याची नांदी आहे. लोकसभेत जो अभूतपूर्व विजय भाजप पक्षाला मिळणार आहे, आणि एनडीएला मिळणार आहे त्याची ही नांदी आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट झालंय, जी इंडिया आघाडी निर्माण झाली होती तिला लोकांनी नाकारलेलं आहे. राहुल गांधींनी जो अजेंडा चालवला होता, त्यालाही लोकांनी नाकारलं आहे, लोकांच्या मनात केवळ मोदी आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘विरोधकांकडून ईव्हीएमवर खापर फोडलं जाईल’
“मला पूर्ण कल्पना आहे. यानंतर इंडिया आघाडीची बैठक होईल. या बैठकीत खापर ईव्हीएमवर फोडलं जाईल, याची मला पूर्ण खात्री आहे. त्यांनी कुणावरही खापर फोडलं तरी जनता ही मोदींच्या पाठिशी आहे. हीच परिस्थिती महाराष्ट्रातदेखील आहे. महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दोन तृतीयांश ग्रामपंचायती आमच्या महायुतीने जिंकल्या. लोकसभेतही आपल्याला तेच पाहायला मिळणार आहे. मोदींनी जो विकास आणि विश्वास निर्माण केलाय त्या आधारावर भारतात आणि महाराष्ट्रात भाजप पक्षाचं सरकार पुन्हा स्थापन होईल”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.