मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या आवाहनानंतर अंधेरीच्या पोटनिवडणुकीवरून भाजपची चांगलीच पंचाईत झाली आहे. राज ठाकरे यांनी भाजपला निवडणूक न लढवण्याचं आवाहन केलं आहे. त्याला भाजपने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, भाजपचा (bjp) एक गट निवडणूक लढवण्यावर ठाम असून दुसरा गट निवडणूक न लढवण्याच्या मताचा आहे. त्यामुळे भाजपची गोची झालीय. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून या भेटीत अंधेरीच्या निवडणुकीवर फायनल निर्णय होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी काय करता येईल यावर देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. थोड्याच वेळात या दोन्ही नेत्यांची ही भेट होणार आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या निवडणुकीबाबत आजच निर्णय होण्याची शक्यता आहे.
अंधेरीची निवडणूक लढवण्यावरून भाजपमध्ये दोन मतप्रवाह आहेत. एक गट निवडणूक लढवू नये या भूमिकेत आहे तर दुसरा गट निवडणुकीत आपलाच विजय होईल त्यामुळे ती लढवावी या मानसिकतेत आहेत. त्यामुळे भाजपमध्ये निवडणूक लढण्यावरून मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
निवडणुकीत उमेदवार देणेयापूर्वी जर हा प्रस्ताव आला असता तर विचार झाला असता पण तसं झालं नाही. आता वेळ निघून गेली आहे. भाजपने प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामुळे निवडणुकीतून माघार घेणं योग्य नसल्याचं सांगितलं जात आहे.
राज ठाकरे यांनी निवडणूक लढवू नये असं आवाहन केलं आहे. मुळात राज ठाकरे यांचा पक्ष निवडणूक लढवत नाहीये. उद्धव ठाकरे गट निवडणूक लढत आहे. दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुला लटके या ठाकरे गटातून लढत आहेत. अशावेळी निवडणूक न लढण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी करायला हवं होतं. त्यांनी कोणतंही आवाहन केलेले नसताना उमेदवारी मागे घेणं कितपत योग्य ठरेल, असं मत भाजपच्या दुसऱ्या गटाचं आहे.
मुरजी पटेल यांना मतदार संघात प्रचंड प्रतिसाद मिळतोय, त्यांनी फॉर्म भरलाय. त्यामुळे ही निवडणुक भाजपने लढवावी अशी आशिष शेलार यांची मागणी आहे. शेलार ही निवडणुक लढवण्यावर ठाम आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून महापालिका निवडणुकीची हवा तयार केली जाऊ शकते, असंही त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे भाजप आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.