मुंबई | 4 जुलै 2023 : राज्यातील मुंबईसह अनेक महापालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. अनेक महापालिकांवर प्रशासक नेमण्यात आला आहे. त्यावरून विरोधकांनी वारंवार सत्ताधारी शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवलेला आहे. सरकारमुळेच या निवडणुका रखडल्याचा दावा विरोधकांनी केला होता. मात्र, विरोधकांच्या या दाव्यातील हवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढून घेतली आहे. राज्य सरकारने निवडणुका अडवून ठेवलेल्या नाहीत, असं जाहीर विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. विधान परिषदेत एका प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस यांनी हा खुलासा केला आहे.
निवडणूक घेण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. निवडणूक घेण्याचा अधिकार मुंबई महापालिका 1888 कलम 18 (1) अन्वये महापालिकेच्या सर्व निवडणुका घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला आहे. निवडणूक आयोगाने 4 ऑगस्ट 2022 अन्वये महापालिकेला सार्वत्रिक प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले आहेत. जाणीवपूर्वक सांगतो, मुंबई महापालिकेसहीत सर्व पालिकेच्या आम्हाला निवडणुका हव्या आहेत. आम्ही तयारीत आहोत. आम्हाला पाहिजे निवडणूक. पण सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे जाता येत नाही. तरीही आपल्याला वाटत असेल तर निवडणूक आयोग स्वायत्त आहे. तुम्ही जाऊन त्यांच्याकडे माहिती घ्या. नसेल तर सर्व मिळून आपण एकत्र जाऊ आणि निवडणूक घेण्याची मागणी करू, असं आव्हानच देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केलं आहे.
यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावरूनही प्रतिक्रिया व्यक्त केली. औरंगजेबाच्या मिरवणुकी, स्टेट्स ठेवले गेले. एकाच वेळी अनेक जिल्ह्यात हा प्रकार झाला. हा काही योगायोग नाही. हा प्रयोग आहे. आजपर्यंत भारतीय मुसलमानांचा हिरो कधी औरंजेब नव्हता. या देशाचे हिरो छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजच होऊ शकतात. एपीजे अब्दुल कलाम होऊ शकतात. पण औरंगजेब होऊ शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.
ज्याप्रकारे संभाजी महाराजांचा छळ करून त्यांच्या शरीराचे तुकडे केले. तो औरंगजेब हिरो होऊच शकत नाही. टर्किक मंगोल वंशाचे भारत आणि पाकिस्तानात मिळून काही लाख लोक आहेत. त्यांचे वंशजही भारतात नाही. पण अचानक औरंगजेबाचं महिमामंडन सुरू झालं आहे. त्यामागे काही डिझाईन आहे. काही अटकाही केल्या आहेत. धर्माच्या आणि जातीच्या आधाराव भेदभाव करणार नाही. पण औरंगजेबाचं कोणी महिमामंडन करत असेलत तर सोडणारही नाही, असा इशाराच त्यांनी दिला.
बारसू आंदोलनावरही त्यांनी भाष्य केलं. बारसू आंदोलनासाठी बंगळुरूतून पैसा मिळाला आहे. बंगळुरूतून फंडिंग झालं आहे, असा गंभीर आरोप करतानाच तेच तेच लोक प्रत्येक आंदोलनात कसे दिसतात? असा सवाल त्यांनी केला.