‘रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही, अभ्यास करुन बोलावं’, फडणवीसांचा सल्ला
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एलबीटीवरुन भाजपवर केलेल्या टीकेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे (Devendra Fadnavis on Rohit Pawar).
सातारा : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एलबीटीवरुन भाजपवर केलेल्या टीकेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे (Devendra Fadnavis on Rohit Pawar). रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. कराडच्या कृष्णा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकावरही निशाणा साधला (Devendra Fadnavis on Rohit Pawar).
“रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही. नीट अभ्यास केला पाहिजे आणि बोललं पाहिजे. महाराष्ट्रात एलबीटी जरी असतं तरी आपल्याला पैसे मिळाले नसते. नुकसान झालं, तोटा झाल्याचे बोलून काहीतरी आकडे सांगायचे, असं न करता नीट अभ्यास करुन बोललं पाहिजे”, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
जीएसटीच्या थकबाकीवरुनही राज्य सरकारकडून भाजपवर टीका होत आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी राज्य सरकावर घणाघात केला. “खोटं बोला ते पण रेटून बोला ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची पद्धत आहे. मार्चपर्यंत जीएसटीचे पैसे राज्यांना मिळाले आहेत. ही मागणी मार्चनंतरची आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
रोहित पवार नेमकं काय म्हणाले होते?
“राज्यात भाजपची सत्ता होती त्यावेळी त्यांनी एलबीटी घाईघाईने रद्द केला. त्यामुळे गेल्या पाच वर्षात 26 हजार कोटींचं नुकसान झालं. त्यासाठी त्यांनी एकदाही पाठपुरावा केला नाही. हा पैसा जर आपल्याला मिळाला असता तर आरोग्य आणि इतर गोष्टींसाठी तो खर्च करता आला असता. मात्र ते भाजप आहे. त्यांना राजकारणच सुचतं”, अशी टीका रोहित पवार यांनी केली होती.
“भाजप नेत्यांना खरच महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील लोकांबद्दल कळवळा असता तर जीएसटीचे पैसे अनेक महिन्यांपासून केंद्र सरकारकडे अडकले आहेत. ते पैसे त्यांनी मागितले असते”, असा घणाघात रोहित पवार यांनी केला होता.
“आपल्या राज्यासाठी आणि लोकांसाठी राज्यातील भाजप नेत्यांनी एकदाही केंद्र सरकारकडे आवाज उठवला नाही. तसं कदाचित त्यांच्या धोरणात असेल किंवा भीतीपोटी केंद्राविषयी त्यांच्यातला कुठलाही नेता बोलू शकत नाही”, असा टोला रोहित पवार यांनी लगावला होता.
संबंधित बातमी : ‘महाराष्ट्राप्रती खरंच कळवळा असता तर जीएसटीचे पैसे मागितले असते’, रोहित पवारांचा भाजप नेत्यांवर निशाणा