Eknath Shinde : महाराष्ट्रात पुन्हा फडणवीस सरकार? देवेंद्र दिल्लीला रवाना, या 5 शक्यता नाकारता येत नाही
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस आज सकाळीच तातडीने दिल्लीत आले आहेत. यावेळी ते दिल्लीतील बड्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. यावेळी ते जेपी नड्डा आणि अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबई: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारलं आहे. जवळपास 29 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे हे गुजरातच्या सुरतमध्ये दाखल झाले आहेत. वेगळा गट किंवा भाजपमध्ये (bjp) प्रवेश करण्याच्या हालचाली शिंदे यांनी सुरू केल्या आहेत. आज संध्याकाळपर्यंत ते भाजपचे नेते अमित शहा (amit shah) यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या प्रत्यके हालचालींकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर तात्काळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली गाठली आहे. दिल्लीतील बड्या नेत्यांसोबत फडणवीस चर्चा करणार आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा फडणवीस सरकार येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. शिंदे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार असल्याच्याही चर्चा होत आहे. फडणवीस दिल्लीत गेल्याने या चर्चांना अधिक जोर चढला आहे.
शिंदेना भाजपमध्ये प्रवेश देणार?
देवेंद्र फडणवीस आज सकाळीच तातडीने दिल्लीत आले आहेत. यावेळी ते दिल्लीतील बड्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. यावेळी ते जेपी नड्डा आणि अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी शिंदे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच शिंदेंसोबत किती आमदार आहेत आणि त्यांचं पुनर्वसन कसं करायचं याची माहितीही शहा यांना देण्यात येणार असल्याचं सांगितलं जातं आहे.
शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद?
शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद आणि शिंदेंसोबतच्या काही मंत्र्यांना मंत्रिपद देण्याबाबतची चर्चाही या नेत्यांसोबत करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. या शिवाय ईडीची कारवाई सुरू असलेले काही आमदारही शिंदेंसोबत आहेत, त्यांचं काय करायचं याबाबतही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
त्या 22 आमदारांवरही चर्चा
विधान परिषदेच्या निवडणुकीत विरोधी पक्षातील 22 आमदारांनी भाजपला मतदान केलं. याच आमदारांनी राज्यसभा निवडणुकीतही भाजपला मतदान केलं होतं. त्यामुळे या 22 आमदारांनाही भाजपमध्ये प्रवेश देण्यावर चर्चा करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. या 22 आमदारांपैकी बहुतेक आमदार हे अपक्षव आहेत किंवा छोट्या पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही. त्यामुळे या आमदारांना पक्षात प्रवेश देण्याबाबतही चर्चा होऊ शकते.
राजभवन सक्रिय होणार?
शिंदे यांच्या बंडामुळे आघाडी सरकार अल्पमतात आलं आहे. त्यामुळे शिंदे यांचं मन वळवलं जाण्याच्या आत राजभवनाला सक्रिय केलं जाण्याची शक्यता आहे. राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. तशी तारीखही राज्यपालांकडून आघाडी सरकारला दिली जाऊ शकते. त्यामुळे आघाडीतील बंड तेवत राहील आणि भाजपचा सत्तेत परतण्याचा मार्ग सोपा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
अविश्वास ठराव आणणार?
शिंदे यांनी बंड पुकारलं आहे. त्यांच्यासोबत 13 आमदार आहेत. त्यामुळे सरकार अल्पमतात आलेलं आहे. अशावेळी भाजपकडून अविश्वास ठराव मांडला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यावरही फडणवीस वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील असं सांगितलं जात आहे.