Sharad Pawar : ‘माझे सासरे शिंदे’ शरद पवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर ऐकण्यासारखंय!
पवार म्हणतात, 'माझे सासरे शिंदे!' त्यावर फडणवीसांनी जे म्हटलं, त्यावर शरद पवारही खळखळून हसले! पाहा व्हिडीओ
दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून खोचक टोलेबाजी केली. मी शिंदे यांचा जावई होतो, याची आठवण पवारांनी यावेळी करुन दिली. माझे सासरे शिंदे होते, असं शरद पवार यांनी यावेळी म्हटलंय. दरम्यान, यानंतर त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्देशून एक सूचनादेखील केली. महत्त्वाचं म्हणजे पवारांनी केलेल्या सूचनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तरात केलेल्या विधानाने खुद्द शरद पवारही खळखळून हसले होते. यावेळी सभागृहात एकच हशा पिकला होता.
असा होता नेमका संवाद!
शरद पवार यांनी एमसीच्या कार्यक्रमात म्हटलं की,
माझे सासरे शिंदे होते. फक्त शिंदे नव्हते क्रिकेटर शिंदे होते. ते शिंदे होते आणि शिंदेंची मुलगी पवारांची बायको आहे, त्यामुळे शिंदेंनी आपल्या मुलीची नीट काळजी घेण्यासाठी जावयाच्या ज्या काही सूचना असतील त्यांचा गांभीर्यानं विचार करावा, एवढीच या ठिकाणी विनंती करतो.
हे सुद्धा वाचा
शरद पवार यांनी केलेल्या या मिष्कील विधानाने सगळेच हसले. टाळ्यांचाही कडकडाट झाला. हसत-खेळत सुरु असलेल्या या भाषणानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
फडणवीसांचा मिष्कील प्रत्युत्तर
या वेळी फडणवीसांनी पवारांना दिलेल्या हजरजबाबी उत्तराचीही अनेकांनी स्तुती केली. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मनोगतामध्ये पवारांच्या वक्तव्याचा उल्लेख करत म्हटलं, की..
आता पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांवर जी काही जबाबदारी टाकली आहे. त्यात मुख्यमंत्र्यांना असं बांधलं आहे की आता सासरच्या माणसांना कोण टाळू शकतं?
पाहा व्हिडीओ :
पवार, फडणवीस यांच्यातील या मिष्किल आणि अराजकीय जुगलबंदीने एमसीएच्या बुधवारी झालेल्या कार्यक्रमाची तुफान चर्चा रंगली. एमसीए निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, मिलिद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक, आशिष शेलार असे दिग्गज एकाच मंचावर दिसले. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच पवार, शिंदे आणि फडणवीस एकाच मंचावर आल्यानं राजकीय वर्तुळाचंही या कार्यक्रमाकडे लक्ष लागलं होतं.