आंदोलन केलं की अटक, लोकशाहीत चर्चेला स्थानच नाही का? रवी राणा यांच्या अटकेवर फडणवीसांचा सवाल
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा आंदोलनासाठी मुंबईकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या कारवाईवरुन देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे (Devendra Fadnavis slams Maharashtra Government).
अमरावती : आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी उद्या (16 नोव्हेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. विदर्भातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हेक्टरी मदत मिळावी, लॉकडाऊन काळातील विजेचे बिल निम्मे माफ करावे, या मागणीसाठी राणा दाम्पत्य शेतकर्यांसह आज मुंबईसाठी निघणार होते. मात्र त्यापूर्वीच त्यांना अमरावती पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस आयुक्तालयात दाखल केले. पोलिसांच्या या कारवाईवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर प्रश्न उपस्थित केले आहेत (Devendra Fadnavis slams Maharashtra Government).
“शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली, म्हणून रवी राणा यांनी आंदोलन केले तर त्यांना कारागृहात डांबले. शेतकऱ्यांचे निवेदन घेऊन ‘मातोश्री’वर भेटण्यासाठी रेल्वेने निघाले, तर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा अमरावतीत पुन्हा स्थानबद्ध केलं. 25-50 हजार हेक्टरी मदतीच्या गप्पा करणाऱ्यांना शेतकऱ्यांचा इतका तिरस्कार का?”, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“निवेदन स्वीकारुन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली असती. त्यांचे दुःख समजून घेतले असते, तर किमान आपले म्हणणे ऐकून घेतल्याचे तर समाधान शेतकऱ्यांना मिळाले असते. आंदोलन केले की अटक, कुणी काही बोलले की अटक, हे थांबणार केव्हा? लोकशाहीत चर्चेला स्थानच नाही का?”, असे सवाल फडणवीस यांनी केले (Devendra Fadnavis slams Maharashtra Government).
शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली, म्हणून आंदोलन केले तर कारागृहात डांबले!
शेतकऱ्यांचे निवेदन घेऊन ‘मातोश्री‘वर भेटण्यासाठी रेल्वेने निघाले, तर खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा अमरावतीत पुन्हा स्थानबद्ध!
25-50 हजार हेक्टरी मदतीच्या गप्पा करणाऱ्यांना शेतकऱ्यांचा इतका तिरस्कार का?
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 15, 2020
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यासारथी परिस्थिती : रवी राणा
दरम्यान, पोलिसांनी त्याबात घेतल्यानंतर रवी राणा यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात हुकूमशाही चालवली आहे. आज आणीबाणीच्या काळाची आठवण येते. शेतकऱ्यांसाठी आवाज उचलला म्हणून तीन दिवस जेलमध्ये ठेवलं. शेतकऱ्यांनाही अटक केली. आता मुंबईत जाण्यापासून रोखलं. अशाप्रकारच्या हुकुमशाहीमुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावं, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे”, असा घणाघात आमदार रवी राणा यांनी केला.
संबंधित बातम्या :
राज्यात मुख्यमंत्र्यांची हुकूमशाही, राष्ट्रपती राजवट लागू होण्यासारखी परिस्थिती : रवी राणा
‘मातोश्री’बाहेर आंदोलनाचा इशारा, राणा दाम्पत्य मुंबईच्या दिशेला रवाना होण्याआधीच पोलिसांचा घेराव
आमदार रवी राणांसह शेतकऱ्यांची कारागृहातून सुटका, सोमवारी हजारो शेतकऱ्यांसह ‘मातोश्री’वर धडक देणार!