मुंबई : “अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या परिस्थितीत स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे वारंवार केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा प्राथमिक जबाबदारी ही राज्याची आहे. तुम्ही काय करणार हे पहिले सांगा”, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षांना ठणकावलं आहे (Devendra Fadnavis slams Thackeray Government).
देवेंद्र फडणवीस आज (19 ऑक्टोबर) पुणे, सांगली, सातारा भागाचा दौरा करणार आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची ते पाहणी करणार आहेत. या दौऱ्याआधी त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला (Devendra Fadnavis slams Thackeray Government).
“राज्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. आधी कोकणात मग विदर्भात, आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे” असं फडणवीस म्हणाले.
“महाराष्ट्रातला शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. राज्य सरकारकडून तात्काळ मदत मिळावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. पण सरकारकडून अशी कुठलीही मदत दिली जात नाही. हे सरकार गंभीर नाही. हे सरकार फक्त घोषणा करतं. परिस्थितीला गांभीर्याने घेत नाही”, अशी टीका फडणवीस यांनी केली.
“मी काळजीवाहू मुख्यमंत्री होतो तेव्हादेखील शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली होती. शेतकऱ्यांना मदतीसाठी स्वतः देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिलं आहे. केंद्राची मदत दिली जाईल, असं मोदी म्हणाले आहेत. त्यामुळे वारंवार केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा प्राथमिक जबाबदारी ही राज्याचे आहे. तुम्ही काय करणार हे पहिले सांगा”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोलापूरला दौऱ्यासाठी जात आहेत, ही चांगली गोष्ट आहे. एका जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर त्यांना कळेल की शेतकरी किती अडचणीत आहे”, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
संबंधित बातम्या :
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने कर्ज घ्यावं; शरद पवारांची मागणी
अतिवृष्टी ते राजकारण; शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे