Devendra Fadnavis : मुख्यमंत्री शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर, तर फडणवीस राज ठाकरेंना भेटणार; नवी समीकरणं जुळणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवाजी पार्कात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर येत आहेत. आज गुरुपौर्णिमा असल्याने बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिंदे येत आहेत. शिंदे यांच्या स्वागतासाठी शिंदे समर्थक आमदार सदा सरवणकर यांनी जोरदार तयारी केली आहे.
मुंबई: गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) शिवाजी पार्क येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर येत आहेत. यावेळी ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणार आहेत. यावेळी शिंदे समर्थक आमदार आणि दादर, प्रभादेवी आणि माहिम परिसरातील शिंदे समर्थक आमदार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर, दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटायला येत आहेत. राज ठाकरे (raj thackeray) यांनी राज्यसभा आणि विधान परिषदेतील निवडणुकीत भाजपला मदत केली होती. त्यामुळे राज यांचे आभार मानण्यासाठी फडणवीस राज यांच्या शिवतिर्थ या निवासस्थानी येत असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या भेटीत या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय विषयावरही चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येतं. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवाजी पार्कात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर येत आहेत. आज गुरुपौर्णिमा असल्याने बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिंदे येत आहेत. शिंदे यांच्या स्वागतासाठी शिंदे समर्थक आमदार सदा सरवणकर यांनी जोरदार तयारी केली आहे. सरवणकर यांनी या परिसरात मोठे बॅनर्स लावले आहेत. त्यावर, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही…, असं लिहिलं आहे. हेच ट्विट मुख्यमंत्र्यांनीही सकाळी केलं होतं. त्यामुळे शिंदे गटाकडून शिवसेनेला डिवचले जात असल्याचं या निमित्ताने सांगितलं जात आहे.
मनसे-भाजपचे सूर जुळणार
एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवाजी पार्कवर येत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही शिवाजी पार्क परिसरात येणार आहेत. मात्र, ते राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी येणार आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जातं. राज ठाकरे यांनी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणत्याही अटीशिवाय भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी फडणवीस येत आहेत. राज यांचे आभार मानण्यासाठी त्यांना भेटायला जाणार असल्याचं फडणवीस यांनी अनेकदा सांगितलं होतं. त्यानुसार ते आता राज यांना भेटणार आहेत. राज यांच्या प्रकृतीची चौकशी करतानाच राजकीय विषयांवरही या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा होऊ शकते, असं सांगितलं जातं. त्यामुळे मनसे आणि भाजपचं सूत जुळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.