Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंची भेट घेणार, तब्येतेची विचारपूस आणि महापालिका निवडणुकीवर चर्चा होणार?
देवेंद्र फडणवीस शुक्रवारी (15 जुलै) राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या राज यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. सकाळी 11 वाजता ही बैठक होणार असल्याची माहिती मिळतेय.
मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. मात्र, या सर्व घडामोडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) एकदाही समोर दिसले नाहीत किंवा त्यांची एखादी प्रतिक्रियाही समोर आली नाही. कारण, त्याच काळात राज ठाकरे यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया पार पडली. मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आणि महत्वाचा सल्लाही दिला होता. राज ठाकरे यांच्या शुभेच्छांनी देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) भारावले. विधानसभेत त्यांनी राज यांच्या शुभेच्छांचा आवर्जुन उल्लेखही केला होता. त्याचबरोबर आपण राज ठाकरे यांच्या भेटीला जाणार असल्याचंही फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. त्यानुसार आता देवेंद्र फडणवीस शुक्रवारी (15 जुलै) राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या राज यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. सकाळी 11 वाजता ही बैठक होणार असल्याची माहिती मिळतेय.
दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीसाठी जाणार होते. मात्र, मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. तसंच फडणवीस पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर होते. त्यामुळे ही भेट आता उद्या होणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. त्यावेळी फडणवीस राज यांच्या तब्येतीची विचारपूस करतील. तसंच राज्यातील राजकीय स्थिती आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये महत्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
राज ठाकरेंच्या फडणवीसांना शुभेच्छा
पक्षादेशामुळे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार शेरेबाजी केली. मात्र, राज ठाकरे यांनी फडणवीसांचं कौतुक केलं. ‘ही बढती आहे की अवनती ह्यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. ह्या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला ह्या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे. एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिध्द केलेलंच आहे त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना’, अशा शब्दात राज ठाकरे यांनी फडणवीसांचं कौतुक केलं होतं.
श्री. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन! pic.twitter.com/2TokAB3E1F
— Raj Thackeray (@RajThackeray) July 1, 2022
फडणवीसांनीही मानले राज ठाकरेंचे आभार
राज ठाकरे यांचे आभार व्यक्त करताना फडणवीस म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुंदर पत्र लिहिलं. मी उत्तर देणार होतो. पण त्यांच्यासारखे शब्द मला सुचले नाही. फोन करुन त्यांचे आभार मानले. मी राज ठाकरेंची भेटही घेणार आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं होतं.