मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर पाठीच्या मणक्यासंदर्भात शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे प्रत्यक्षपणे कुठल्याही कार्यक्रमात किंवा कामकाजात सहभागी होत नाहीत. आजपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनातही (Winter Session) मुख्यमंत्री सभागृहात उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजपमधील नेत्यांकडून जोरदार टीका केली जातेय. अशावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मात्र उद्धव ठाकरे यांना महत्वाचा सल्ला दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीवरुन टीका करण्यात येत आहे. त्याबाबत पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला. तावर बोलताना ‘माननीय मुख्यमंत्र्यांची तब्येत खराब असेल आणि ते येत नाहीत म्हणून आक्षेप घेणं बरोबर नाही. तब्येत खराब असेल त्यामुळे ते आले नाहीत तरीही आम्ही अधिवेशन पार पाडू. आमचं म्हणणं एवढंच आहे की कामकाज व्हावं. आमचं सरकार असताना एखादा मंत्री आजारपणामुळे सभागृहात उपस्थित राहू शकला नाही तर आम्ही त्या खात्याची जबाबदारी दुसऱ्या मंत्र्याकडे दिली होती. मुख्यमंत्र्यांनी जबाबदाऱ्यांचं वाटप करावं’, असा सल्ला फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीवरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे ते गैरहजर असणे स्वाभाविक आहे. आमच्या एवढाच आग्रह असा आहे की, परंपरेनुसार तुम्ही कुणाला तरी चार्ज द्यावा. त्याची प्रोसेस लंबी आहे. त्यासाठी चार्ज राज्यपालांकडे रजिस्टर करावा लागतो. तुम्ही राज्यपालांना कितीही मानायचं नाही ठरवलं तरी सुद्धा राज्यपालाशिवाय काहीही करता येत नाही. त्यांचा अन्य दोन सहकाऱ्यांसोबतचा अविश्वास स्वाभाविकच आहे. कारण त्यांनी तो चार्ज घेतला, तर सोडणारच नाहीत. त्यांच्या जर पार्टीतही कोणाकडे विश्वास नसेल, तर रश्मी वहिनींना चार्ज देवून त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकतं. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या. आदित्य ठाकरेंनाही ते चार्ज देवू शकतात. आदित्य ठाकरेंकडे चार्ज दिला पाहिजे, असं चंद्रकांतदादा म्हणाले.
‘आपल्या राज्याला मुख्यमंत्रीच राहिलेला नाही. राज्याचे अधिवेशन सुरू आहे, मात्र मुख्यमंत्री कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे राज्य नेमके कोण चालवतो असा प्रश्न पडतो. राज्याचा चार्ज सध्या कोणाकडे दिला आहे, याचीही काही माहिती नाही. रश्मी ठाकरे या मुख्यमंत्री होणार आहे, अशी चर्चा आहे, निदान ते तरी जाहीर करा’, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलीय.
इतर बातम्या :