फोडाफोडीचं नवं खातं तयार करुन महाजनांना त्याचा मंत्री करा : धनंजय मुंडे
राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी जलसंपदा मंत्री गिरिश महाजन यांना उपरोधिक टोला लगावला आहे. फडणवीस सरकारने फोडाफोडीचं नवं खांत तयार करावं आणि त्यांचा मंत्री महाजनांना करावं, असा सल्ला मुंडेंनी दिला.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी जलसंपदा मंत्री गिरिश महाजन यांना उपरोधिक टोला लगावला आहे. फडणवीस सरकारने फोडाफोडीचं नवं खातं तयार करावं आणि त्यांचा मंत्री महाजनांना करावं, असा सल्ला धनंजय मुंडेंनी दिला. ते मुंबईत विरोधी पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.
धनंजय मुंडे म्हणाले, “राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. जनता होरपळत आहे. सरकार जलयुक्त शिवार योजना योग्य राबवली असं म्हणत आहे, पण सर्व खोटं आहे.” सरकारने सरसकट कर्जमाफी करावी. तसेच दुष्काळ निवारणाचे काम वेगाने करावं, अशी मागणी अधिवेशनात करणार असल्याचीही माहिती मुंडेंनी दिली. उद्धव ठाकरे यांनी उन्हाळी सुट्टी बाहेर काढली आणि आता त्यांना दुष्काळ दिसत असल्याचाही टोला मुंडेंनी लगावला.
दीड डझन मंत्र्यांचे भ्रष्टाचाराचे पुरावे दिले, तरी काहीही केलं नाही. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांना क्लिनचिट दिली जात असल्याचा आरोप मुंडेंनी फडणवीस सरकारवर केला. तसेच भ्रष्टाचारी मंत्र्यांचा मुद्दा अधिवेशनात लावून धरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रकाश मेहता यांचा फक्त राजीनामा घेऊन जमणार नाही. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली.
सरकारच्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार
राज्यावर कर्जाचा बोजा असून सर्व काही आलबेल असल्याचा फडणवीस सरकारचा दावा केवळ आभासी असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. यावेळी विरोधी पक्षांनी सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचीही घोषणा केली.