गोगलगायींचा शेतकऱ्यांच्या पोटावर पाय, शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत द्या; धनंजय मुंडेंची सरकारकडे मागणी
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केलीय. संबंधित शेतकऱ्यांना बोंड अळीच्या वेळी ज्याप्रमाणे मदत केली, त्या धर्तीवर विशेष आर्थिक मदत करण्याची मागणी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केलीय.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय आज झाला. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात सोयाबीन आणि अन्य पिकांवर गोगलगायीचा प्रादुर्भाव झाल्याने जे नुकसान झाले होते, त्या शेतकऱ्यांना मदत (Farmer Help) देण्याचा निर्णय झाला नाही. याबाबत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केलीय. संबंधित शेतकऱ्यांना बोंड अळीच्या वेळी ज्याप्रमाणे मदत केली, त्या धर्तीवर विशेष आर्थिक मदत करण्याची मागणी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केलीय.
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय झाला, मात्र गोगलगायीच्या प्रादुर्भावाने सोयाबीन सह अन्य काही पिकांचे अक्षरशः वाटोळे झाले आहे. त्या शेतकऱ्यांना तीन-चार पेरण्या करूनही काही हाती लागण्याची चिन्हे नाहीत. अशा शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत विचार झाला नाही. त्यामुळे अशा गोगलगाईमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही निकष बाजूला ठेऊन विशेष आर्थिक मदत करा अशी आग्रही मागणी मुंडेंनी केलीय.
मागील काळात बोंड अळीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे मदत केली गेली, त्याप्रमाणे आमच्या शेतकऱ्यांना निकष बाजूला ठेवून विशेष आर्थिक मदत देण्याची गरज आहे. वाया गेलेल्या तीन-चार पेरण्या, गोगलगायींचे नियंत्रण व संपत चाललेला हंगाम असे तिहेरी संकट आहे. @CMOMaharashtra
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 10, 2022
गोगलगायीबाबत निर्णय न झाल्यानं मुंडेंकडून नाराजी व्यक्त
धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात याआधीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना पत्राद्वारे मागणी केली होती. आज मंत्रिमंडळ बैठकीत मदतीचा निर्णय झाल्यानंतर गोगलगायी संदर्भात निर्णय न झाल्याने धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त करत ट्विट केलंय. मागील काळात बोंड अळीचा कापसावर प्रादुर्भाव झाला तेव्हा ज्याप्रमाणे विशेष आर्थिक पॅकेजद्वारे शेतकऱ्यांना मदत झाली होती, त्याच प्रमाणे मदतीची आवश्यकता असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
गोगलगायींमुळे हजारो हेक्टर पिकाचं नुकसान
बीड जिल्ह्यातील सुमारे 4 हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकांचे गोगलगायीनी अक्षरशः वाटोळे केले. शेतकऱ्यांनी तीन-चार वेळा पेरण्या केल्या, मात्र गोगलगायीचे नियंत्रणही नाही. हंगाम संपत चालला तरी पीक हाती लागण्याची काही चिन्हे नाहीत, अशी विदारक परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. हजारो हेक्टर वरील नुकसान झालेल्या शेती पिकांचे प्रशासनाने पंचनामे देखील केले आहेत. धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या या परिस्थितीची सरकारला जाणीव करुन देत, तातडीने विशेष आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.