बौद्ध महासभेच्या कार्यक्रमात दिल्लीचा कॅबिनेट मंत्री; भाजपचा आम आदमी पार्टीला सवाल

| Updated on: Oct 07, 2022 | 1:45 PM

बाबासाहेबांनीच भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली होती, त्याच बॅनरखाली हा कार्यक्रम होत असतो, असंही त्यांनी सांगितलं. विज्ञानाचा मार्ग अवलंबावा म्हणूनच या 22 प्रतिज्ञा दिल्या जात असतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बौद्ध महासभेच्या कार्यक्रमात दिल्लीचा कॅबिनेट मंत्री; भाजपचा आम आदमी पार्टीला सवाल
बौद्ध महासभेच्या कार्यक्रमात दिल्लीचा कॅबिनेट मंत्री; भाजपचा आम आदमी पार्टीला सवाल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: नागपुरातील दीक्षाभूमीवर (diksha bhumi) झालेल्या कार्यक्रमात केजरीवाल सरकारमधील मंत्री सहभागी झाल्याने त्यावरून भाजप आणि आम आदमी पार्टी (aap) आमनेसामने आली आहे. या मुद्द्यावरून भाजपने (bjp) आम आदमी पार्टीवर जोरदार टीका केली आहे. आम आदमी पार्टी गरीब हिंदुंना मोफत सामान देऊ त्यांचं धर्मांतर करणारी एजन्सी बनली आहे, अशी टीका भाजप नेते कपिल मिश्रा यांनी केली आहे. तर आम आदमी पार्टी हिंदू विरोधी आहे काय?, असा सवाल भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी केला आहे.

अरविंद केजरीवाल सरकारमधील कॅबिनेट मंत्री राजेंद्र पाल गौतम हे दसऱ्याच्या दिवशी नागपूरच्या दीक्षाभूमीवरील भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावर भाजपने आक्षेप घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

भाजप नेते कपिल मिश्रा यांनी ट्विट करून हा आक्षेप घेतला आहे. केजरीवाल यांचे मंत्री दिल्लीतील हिंदू आणि हिंदु देवदेवतांवर टीका करत आहेत. तर दुसरीकडे केजरीवाल गुजरातमध्ये जय श्री कृष्णा म्हणत मते मागत आहेत. आम आदमी पार्टी गरीबांना मोफत सामान देऊन त्यांचं धर्मांतर करणारी एजन्सी बनली आहे, असं मिश्रा यांनी म्हटलं आहे. याबाबतचं वृत्त आजतकने दिलं आहे.

मनोज तिवारी यांनी नागपूरच्या कार्यक्रमातील व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यात हिंदू धर्माच्या देवी-देवतांना मानणार नसल्याची प्रतिज्ञा देण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. त्यावरून तिवारी यांनी आम आदमी पार्टी हिंदू विरोधी आहे का? असा सवाल करतानाच आम आदमी पार्टीचे मंत्री हिंदू धर्माच्या विरोधात शपथ घेत आहेत आणि इतरांनाही देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

राजेंद्र पाल यांनी भाजप नेत्यांचे सर्व हस्यास्पद आरोप खोडून काढले आहेत. 1956 पासून देशातच नव्हे तर जगभरात बौद्ध धर्माची दीक्षा घेतली जात आहे. प्रत्येक वर्षी दसऱ्याच्या दिवशी हा कार्यक्रम होत असतो. नागपूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर केलं होतं.

त्यामुळे या दिनाचं औचित्य साधून देशभरातील 15 ते 20 लाख लोक या ठिकाणी दरवर्षी एकत्रित येतात. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, मध्यप्रदेश आणि बिहारसह देशातील विविध भागात धर्मांतर दिनाचे कार्यक्रम होत असतात, असं राजेंद्र पाल गौतम यांनी म्हटलं आहे.

 

बाबासाहेबांनी नागपुरात धम्म दीक्षा घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या अनुयायांना 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या. या प्रतिज्ञा म्हणजे कुणाच्या आस्थेला धक्का देण्याचा प्रयत्न नाही. तर देश अधिक मजबूत करणं आणि देशाला जातीयवादापासून मुक्त करण्याचा त्याचा हेतू आहे. भारतात दलितांना आजही चांगली वागणूक दिली जात नाही. त्यामुळे लोक धर्मांतर करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

दीक्षाभूमीवरील कार्यक्रम म्हणजे आम आदमी पार्टीचा कार्यक्रम नाही. भारतीय बौद्ध महासभा दरवर्षी हा कार्यक्रम घेत असते. त्यामुळे कुणाला त्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. हा राजकीय कार्यक्रम नसतो. तो धार्मिक कार्यक्रम आहे आणि 1956 पासून हा कार्यक्रम होत असतो.

बाबासाहेबांनीच भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली होती, त्याच बॅनरखाली हा कार्यक्रम होत असतो, असंही त्यांनी सांगितलं. विज्ञानाचा मार्ग अवलंबावा म्हणूनच या 22 प्रतिज्ञा दिल्या जात असतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.