मुंबई: अभिनेत्री दिपाली सय्यद यांना अजूनही शिंदे गटात प्रवेश मिळालेला नाही. त्यांच्या प्रवेशाची नवी तारीखही जाहीर करण्यात आलेली नाही. दिपाली सय्यद यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला भाजपने विरोध केल्याने हा प्रवेश रखडल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहेत. मात्र, या सर्व तर्कांना दिपाली सय्यद यांनी पूर्णविराम दिला आहे. तसेच मी तर शिंदे गटात प्रवेश करणार आहेच. पण उद्धव ठाकरे यांनीही शिंदे गटात प्रवेश करावा, असा खोचक सल्ला दिपाली सय्यद यांनी दिला आहे.
दिपाली सय्यद यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मी ठाकरे गटात मी मनापासून काम केलं होतं. सर्वांनी एकत्र येऊन काम करावं ही माझी इच्छा होती. पण मला हवी तशी साथ मिळाली नाही. म्हणून मी इकडे प्रवेश करणार आहे. माझं तर म्हणणं आहे की, उद्धव साहेबांनी स्वतः शिंदे गटात प्रवेश करावा. मी जबाबदारीने सांगतेय की, माझ्या पक्षप्रवेशाच्या वेळी उद्धव ठाकरेही त्या स्टेजवर असतील, असं दिपाली सय्यद म्हणाल्या.
माझी एकच तारीख डिक्लेअर झाली होती. रविवारी माझा प्रवेश होणार होता. त्यावेळी काही अडचण आली. मग वेगळ्या पद्धतीने प्रवेश करण्याचं ठरलं. जी तारीख असेल ती जाहीर करून नंतर पक्षप्रवेश होणार आहे.
माझ्या प्रवेशाला कोणी अडकाठी घेतंय किंवा भाजप विरोध करतंय असं काही नाही. असं काही आहे का हे मी शिंदेंना विचारलं. तर त्यांनी नाही म्हणून सांगितलंय, असा दावाही त्यांनी केला.
माझा पक्षप्रवेश लवकरच होणार आहे. डिसेंबरमध्ये पक्षप्रवेश होईल. जी तारीख असेल ती ठरवली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. प्रत्येकजण विचार करूनच ठाकरे गटातून हळूहळू बाहेर पडतोय. कोणासाठी काय चांगलं, काय हिताचे आहे हे प्रत्येकाला कळतं. महाराष्ट्रच्या हितासाठी एकनाथ शिंदे काम करत आहेत, असं त्या म्हणाल्या.
अनेक वर्षांपासून महिला महाराष्ट्र केसरी व्हावी यासाठी मी पाठपुरावा करतेय. त्याचसंदर्भात मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलीय, असंही त्यांनी सांगितलं.