पुणे: अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दिपाली सय्यद मुख्यमंत्र्यांना वारंवार भेटत आहेत. त्यामुळे दिपाली सय्यद या ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजच्या भेटीमुळे तर या चर्चांना बळ मिळालेलं असतानाच ठाकरे गटाचे नेते शंभुराज देसाई यांनी दिपाली सय्यद आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर मोठं विधान करून या चर्चांना हवा देण्याचं काम केलं आहे.
मंत्री शंभुराज देसाई यांनी मीडियाशी संवाद साधताना मोठं विधान केलं आहे. दिपाली सय्यद काही पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटत नाहीये. ही त्यांची तिसरी चौथी भेट आहे. शिल्लक सेनेत कोणी शिल्लक राहील असं वाटत नाही. दिपाली सय्यद आमच्या गटात येत असतील तर स्वागत करू. दिपाली सय्यद यांच्या प्रवेशामुळे शिंदे गट भक्कमच होईल, असा दावा शंभुराज देसाई यांनी केला आहे.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्यामुळे राष्ट्रवादीतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, याप्रकरणावर अजित पवार यांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्याबाबत देसाई यांना विचारलं असता हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
सत्तारांबद्दल म्हणाल तर त्यांच्या वक्तव्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मीही दिलगिरी व्यक्त केली. दीपक केसरकारांनीही त्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. बोलण्याच्या ओघात सत्तारांकडून ते वाक्य गेलं. पण सर्वांनीच त्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे मोठ्या मनाने हा विषय संपवावा, असं आवाहन त्यांनी केलं.
दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक ठिकाणी सत्तार यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. तर मुंबई आणि औरंगाबादमधील सत्तार यांच्या घरावर हल्लाबोल करण्यात आला. यावेळी काही आंदोलकांनी सत्तार यांच्या घराच्या दिशेने दगडफेक केली होती.