मुंबई : विधान परिषदेत आज ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) आणि शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यात चांगली खडाजंगी बघायला मिळाली. अनिल परब यांनी मुंबईतील स्वच्छता गृहांच्या मुद्द्यावरुन काही प्रश्न उपस्थित केले. तसेच संबंधित प्रकरणी शंभूराज देसाई यांनी चुकीची माहिती दिल्ली तर आपण त्यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडू, असा इशारा अनिल परब यांनी दिला. यावेळी अनिल परब सभागृहात चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले. अनिल परब यांच्या या आक्रमकपणाला उत्तर देताना शंभूराज देसाई यांनी मिश्किलपणे टोले लगावत उत्तर दिलं.
“अनिल परब ठसका लागण्यापर्यंत जोरजोरात बोलत आहेत. तब्येतीची काळजी घ्या. थोडीशी काळजी घ्या. कारण सभागृहात अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांना ठसका लागला तर त्यांना पाणी देण्याची सुविधा आहे. सभापती महोदय, सभासदांना प्रश्न विचारताना ठसका लागला तर विशेष काही सुविधा देता आली तर तशी सुविधा आपण उपलब्ध करुन द्यावी”, अशी मिश्किल टिप्पणी शंभूराज देसाई यांनी केली.
“मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो ना. मी मुंबईमधला जरी मंत्री नसलो तरी राज्याचा मंत्री आहे. राज्य मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांची संयुक्त जबाबदारी आहे. त्यामुळे आजच्या दिवसापूरता या विभागाचा पदभार माझ्याकडे देण्यात आला असला तरी मी पूर्ण अभ्यास करुन आलेलो आहे. सदस्यांचं समाधान होत नसेल तर त्यांनी प्रश्न विचारावे. मी त्यांना उत्तरे देईन”, असं शंभूराज देसाई म्हणाले.
“मी जबाबदारीने सांगतोय की, मुंबई महापालिका हद्दीत असणाऱ्या एकूण स्वच्छतागृहांचा उल्लेक करण्यात आला. जो काही आठ हजारांचा आकडा सांगितला आणि अनिल परब जे सांगत आहेत की, जेएम पोर्टलवर या निविदा काढताना त्यांचा अनुभव आणि पूर्व अनुभवाची पडताडणी केली होती का? महापालिकेची निविदा समिती या प्रकरणी तपासणीचं काम करते. या निविदा समितीने सर्व बाबी तपासल्या आणि ओपन करताना सगळ्या अटी-शर्ती फुलफिल केल्या तेव्हाच त्यांनी टेंडर ओपन केले आहेत”, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.
“जेएम पोर्टलवरचा आकडा 36 हजाराचा सांगत असतील तरी यापूर्वी मी याबाबतची माहिती मी मुंबई महापालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांकडून घेतली आहे. यापूर्वी कोम्बो युनिय मुंबई महापालिकेने बसवलेलं नव्हतं. मुंबई महापालिकेचे दोन स्वतंत्र युनिट असायचे. कोम्बो युनिटचं टेंडर आपण पहिल्यांदा काढलेलं आहे. दोन वेगवेगळ्या सुविधा देणारं दोन यंत्र आणि त्या दोन सुविधा एकत्र देणारं कोम्बो युनिट यांच्यातला पूर्वीचा दरातला आणि आजच्या दरातला फरक काढला तर 4500 रुपयांची बचत झालेली आहे. कुठलीही अनियमितता झालेली नाही. नियमानुसार L1 कंपनीला टेंडर देण्यात आलेलं आहे”, असं स्पष्टीकरण शंभूराज देसाई यांनी दिलं.