मुंबईत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, निवडणुकीचं बिगूल वाजण्याआधीच झुंपली
महाविकास आघाडीत सारं काही आलबेल आहे, असं म्हणता येणार नाही. कारण लोकसभेच्या जागावाटपाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गट आणि काँग्रेसचे दोन नेते प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना एकमेकांवर निशाणा साधत आहेत. त्यामुळे लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कसा ठरेल? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई | 29 डिसेंबर 2023 : लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजण्याआधीत मुंबईत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये झुंपल्याचं चित्र आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 23 जागांवर दावा केलाय. तर दुसरीकडे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मुंबईत 3 जागांवर दावा केलाय. यावरुन दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर निशाणा साधला जातोय. जागावाटपाबाबत आमची काँग्रेसच्या दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांच्या बोलण्याकडे आम्ही दुर्लक्ष करतोय, असं राऊत म्हणाले आहेत. तर संजय निरुपम यांनी ठाकरे गट स्वबळावर एकही जागा निवडून आणू शकत नाही, असा टोला लगावला आहे. “आम्हाला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये किती जागा पाहिजे हे मी सांगू शकत नाही. कारण सध्या आता दिल्लीमध्ये चर्चा चालू आहे. मुंबईमध्ये आम्हाला तीन जागा पाहिजेत. कुठला जागा पाहिजे हे नंतर ठरवणार. पण मुंबईमध्ये कमीतकमी तीन जागा आम्हाला पाहिजेत”, अशी भूमिका संजय निरुपम यांनी मांडली आहे.
“आम्ही कुठल्या जागेवर निवडणूक लढणार ते मी सांगू शकत नाही. मी निवडणुकीत पडल्यानंतर आमच्या विभागात सतत काम करत आहेत आणि आता पक्षाला हा निर्णय घ्यायचा आहे. मी दुसऱ्या जागेवर लढणार की नाही हे मी सांगू शकत नाही”, अशी प्रतिक्रिया संजय निरुपम यांनी दिली. तसेच “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट स्वबळावर एकही जागा जिंकू शकणार नाही. त्यांच्याकडे उमेदवार नाहीत. दिल्लीचे नेते येऊन निवडणुकीमध्ये उभे राहणार आहेत का? जिंकलेला खासदारांमध्ये चार-पाच खासदार त्यांच्यासोबतत आहेत. ते पण राहणार की नाही राहणार याबाबतही संशय आहे”, अशा शब्दात निरुपम यांनी निशाणा साधलाय.
संजय निरुपम यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर
“संजय राऊत एक क्षेत्रीय पक्षाचे मोठे राष्ट्रीय नेते आहेत. पण शिवसेनामध्ये जे काही नेते आज वाचलेले आहेत त्यामध्ये ते एक आहेत, ज्यांना सर्वात जास्त माहीत आहे की संजय निरुपम कोण आहे. पण आता जर ते विचारतात की कोण आहे? तर त्यांच्या स्मरणशक्तीत काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे”, असं प्रत्युत्तर संजय निरुपम यांनी राऊतांना दिलं आहे.
हेही वाचा | अक्कू यादव हत्याकांड | 200 ते 400 महिलांनी मिळून त्याला कोर्टात का संपवलं?
“ते आम्हाला दररोज सल्ला देतात. दररोज प्रेस कॉन्फरन्स घेऊन काँग्रेसला सल्ला देणे ही त्यांची सवय आहे. मीडियामध्ये दररोज काँग्रेस विरोधात बोलण्याची काही गरज नाही. भाजप विरोधात ते बोलू शकतात. दररोज नाही तर दर तासात तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि भाजप विरोधात खूप बोला. आम्ही तुमच्यासोबत आहेत”, असं निरुपम म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत घेणार? निरुपम म्हणाले….
संजय निरुपम यांनी यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावरही उत्तर दिलं.”आम्हालाही दिसत आहे की प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीमध्ये येण्याची इच्छा आहे. त्यांना आमच्याबरोबर युती करायची आहे, पण त्यांनी युती करण्यापूर्वी एवढी मोठी अट ठेवलेली आहे. मग एवढी मोठी अट ठेवणार तर युती होणार कशी?”, असा सवाल संजय निरुपम यांनी उपस्थित केलाय.