Draupadi Murmu | ताईने लहानपणापासूनच संघर्ष पाहिलाय…. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या विजयानंतर भाऊ म्हणाले…!
Draupadi Murmu द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकल्यानंतर देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत. त्यांच्या कुटुंबियांनीही मुर्मूंना शुभेच्छा दिल्या आहेत.
Draupadi Murmu यांनी लहानपाणापासूनच संघर्ष पाहिला आहे. त्यांचा राष्ट्रपती पदापर्यंतचा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे, अशी भावूक प्रतिक्रिया द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचे बंधू तारिनिसेन टुडू यांनी दिली आहे. देशातील राष्ट्रपती निवडणुकीची मतमोजणी काल पार पडली. यात एनडीएच्या (NDA) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला. विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांचा पराभव झाला. द्रौपदी मुर्मू यांच्या रुपाने देशातील सर्वोच्च स्थानी प्रथमच आदिवासी समुदायातील महिला विराजमान होणार आहेत. त्यामुळे देशभरातील सामान्य जनतेत आनंद व्यक्त केला जात आहे. देशभरातील नेते, क्रीडापटू, अभिनेत्यांकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच मुर्मू यांचे बंधू तारिनिसेन टुडू यांनीही प्रतिक्रिया दिला आहे. या विजयाबद्दल त्यांनी विशेष अभिनंदन केले असून लवकरच दिल्लीत त्यांच्या भेटीसाठी जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
काय म्हणाले मुर्मूंचे बंधू?
द्रौपदी मुर्मू यांचे भाऊ तारिनिसेन टुडू म्हणाले, ‘ माझी ताई, एक आदिवासी महिला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी झाली आहे. आम्हाला यापेक्षा जास्त आनंद काय असू शकतो… ओडिशात अनेकांना आनंद झालाय. कारण त्यांनी ताईचा लहानपणापासूनचा संघर्ष पाहिला. तिचा हा प्रवास सगळ्यांसाठीच प्रेरणा स्रोत आहे… असं वक्तव्य तारिसिनेन टुडू यांनी केलं. तसेच शनिवारी द्रौपदी मुर्मू यांची दिल्लीत जाऊन भेट घेणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
द्रौपदी मुर्मू मूळ ओडिशातल्या…
एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक तिसऱ्या फेरीतच जिंकली. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म १९५८ मध्ये ओडिशातील मयूरभंजमध्ये झाला. १९७९ मध्ये त्या भुवनेश्वर येथील रमादेवी कॉलेजमधून बीएचे शिक्षण घेतले. त्यानंतर १९९७ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. भाजपात शामिल झाल्या. याच वर्षी त्या खासदार बनल्या. त्यानंतर २००० मध्ये रायरंगपूर येथून त्यांनी आमदारकीची निवडणूक जिंकली. ओडिशा राज्य सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले. आमदार असतानाही त्यांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे २००९ मध्ये त्या पुन्हा एकदा निवडून आल्या. २०१५ ते २०२१ पर्यंत त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या.
देशाचे 15 वे राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती असतील. देशाच्या सर्वोच्च स्थानावर विराजमान होणाऱ्या त्या देशातील पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. गुरुवारी झालेल्या मतमोजणीत नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स अर्थात एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी युपीए अर्थात प्रोग्रेसिव्ह अलायन्सचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पराभूत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मुर्मू यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.